
ADCC Politics : नगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया आता वेग घेत असताना, अर्ज दाखल करण्यापूर्वीच राजकीय शक्तिप्रदर्शनाला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, यावेळी नेत्यांकडून अर्ज दाखल करण्यापेक्षा अर्ज खरेदी करतानाच ‘इव्हेंट’ केला जात असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नेमके काय शिजत आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. ही केवळ शोबाजी आहे की बिनविरोधच्या प्रयत्नांवर दबाव निर्माण करण्याचे राजकीय तंत्र, असा सवाल उपस्थित होत आहे. माजी आमदार राहुल जगताप, विधानपरिषद सभापती राम शिंदे, खासदार निलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, दत्तात्रेय पानसरे या दिग्गजांनी निवडणुकीसाठी अर्ज खरेदी केले आहेत. यापैकी राहुल जगताप यांनी अर्ज दाखलही केला असून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. उर्वरित नेत्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे.
दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख साखर कारखानदार नेत्यांनी संगमनेर येथे बैठक घेतली. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत निवडणूक बिनविरोध करण्याचा सूर लावला असला, तरी दुसरीकडे सोसायटी मतदारांमध्ये निवडणूक व्हावी, अशी भूमिका पुढे येताना दिसत आहे. कारखानदारांच्या माध्यमातून सोसायट्यांना अपेक्षित सवलती मिळत नसल्याचा मुद्दा काही मतदारांकडून उपस्थित केला जात असल्याने बिनविरोध निवडणुकीला विरोधाचा सूर वाढत असल्याचे चित्र आहे.
दुष्काळाच्या नावाखाली बिनविरोधची ‘खेळी’; पण मतदार म्हणतात निवडणूक हवी
संगमनेरच्या बैठकीनंतर राजकीय समीकरणे बदलली?
संगमनेरच्या बैठकीत संभाव्य बिनविरोध जागांबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जाते. मात्र या बैठकीत आपल्याला डावलण्यात आल्याची नाराजी राम शिंदे आणि निलेश लंके यांनी उघडपणे व्यक्त केली आहे. मात्र माध्यमांशी बोलताना लंके यांनी बिनविरोध निवडणुकीला थेट विरोध केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरच्या बैठकीपासून काहीसे दूर राहिलेल्या नेत्यांची स्वतंत्र मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे बोलले जात आहे. दुसऱ्या फळीतील नेत्यांना सोबत घेत प्रस्थापित नेत्यांवर दबाव निर्माण करण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.
अर्ज खरेदीलाच शक्तिप्रदर्शन का? (ADCC Politics)
सामान्यतः निवडणुकीत मोठे नेते शेवटच्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन करतात. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीत समीकरण काहीसे उलटे दिसत आहे. अर्ज खरेदी करतानाच नेते स्वतः उपस्थित राहत असून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, यासाठी सोशल मीडियावरून आवाहने केली जात आहेत. यामुळे अर्ज खरेदी ही केवळ निवडणुकीची प्रक्रिया न राहता राजकीय शक्तिप्रदर्शनाचा कार्यक्रम बनत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, बिनविरोध निवडणुकीसाठी चर्चा सुरू असतानाच या पद्धतीने अर्ज खरेदी केल्याने त्या प्रयत्नांवर दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संगमनेरच्या बैठकीबाबत पालकमंत्री विखेंनी समोर येऊन बोलले पाहिजे : सभापती राम शिंदे
लढण्याची पूर्वतयारी की दबावतंत्र? (ADCC Politics)
संगमनेरच्या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रमुख नेत्यांपैकी प्राजक्त तनपुरे वगळता अद्याप अनेक नेत्यांनी अर्ज खरेदी केलेला नसल्याचे चित्र आहे. त्याचवेळी शिंदे-लंके गटाकडून अर्ज खरेदीलाच मोठ्या कार्यक्रमाचे स्वरूप दिले जात असल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय संघर्षाची दिशा काय असेल, याबाबत उत्सुकता वाढली आहे. एकीकडे बिनविरोध निवडणुकीसाठी नेत्यांची बैठक, तर दुसरीकडे अर्ज खरेदीपासूनच शक्तिप्रदर्शन या परस्परविरोधी घडामोडींमुळे जिल्हा बँकेची निवडणूक खरोखर बिनविरोध होणार की निवडणुकीचा आखाडा रंगणार, याचे चित्र पुढील काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. अर्ज खरेदीचा हा ‘इव्हेंट’ निवडणूक लढण्याची पूर्वतयारी आहे की बिनविरोधच्या प्रयत्नांवर दबाव निर्माण करण्याची राजकीय खेळी, याचे उत्तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात मिळणार आहे.


