Adv. Pratap Dhakne : पाथर्डी : राजकारणात मला यश-अपयश आले, पण मी माझे विचार, तत्त्वे आणि स्वाभिमान कधीच सोडला नाही. आर्थिक नुकसान झाले असेल, पण लाखो मतदारांनी दिलेले प्रेम हीच माझी खरी संपत्ती आहे. तीन दशकांहून अधिक काळ कोणतेही घटनात्मक पद (Constitutional Post) नसतानाही अनेक सहकारी माझ्यासोबत विश्वासाने उभे आहेत. मी उद्या पुन्हा निवडणूक लढवली आणि पराभव झाला तरी गमावण्यासारखे काही उरलेले नाही. मी माझ्या विचारांशी, निर्णयांशी आणि धोरणांशी प्रामाणिक राहिलो आहे. बबनराव ढाकणे (Babanrao Dhakne) यांचा मी मुलगा म्हणून त्यांनी जपलेला स्वाभिमान आणि लोकांप्रती प्रामाणिकपणा जपण्याचा प्रयत्न मी कायम केला आहे. येणाऱ्या काळात सर्वांना सत्यासाठी आणि तरुणांच्या भवितव्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन ॲड. प्रताप ढाकणे (Adv. Pratap Dhakne) यांनी केले.
नक्की वाचा : मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांच्या पहिल्या शपथविधीला 48 वर्षे पूर्ण; लेकीने शेअर केले फोटो
८६४ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र
पाथर्डी येथील एम एम निऱ्हाळी विद्यालयात नोकरी मेळाव्याच्या आयोजन प्रसंगी उद्घाटन कार्यक्रमात ढाकणे बोलत होते. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. नोकरी मेळाव्यात ८६४ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र दिले असून ३२८ विद्यार्थ्यांची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली आहे तर ३४८ विद्यार्थ्यांना जॉब कार्ड चे वाटप करण्यात आले. पंधराशे चाळीस विद्यार्थ्यांनी नोकरी मिळाव्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला. विविध मान्यवरांनी यावेळी ॲड. प्रताप ढाकणे यांचा सत्कार केला.
ढाकणे म्हणाले, देशातील सर्वाधिक तरुण शक्ती भारताकडे असताना बेरोजगारी, ग्रामीण भागातील तरुणांच्या विवाहाचा प्रश्न, दिशाहीन राजकारण आणि युवकांकडे होणारे दुर्लक्ष ही चिंतेची बाब आहे.मतांच्या राजकारणात अडकलेल्या नेतृत्वाने तरुणांच्या भवितव्याचा मूलभूत प्रश्न दुर्लक्षित केला असून रोजगार, मार्गदर्शन आणि स्वाभिमानाची संधी मिळाली नाही तर हीच तरुण शक्ती समाजासाठी धोकादायक ठरू शकते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
राजकीय नेतृत्वाचे संपूर्ण लक्ष मतांच्या राजकारणावर (Adv. Pratap Dhakne)
समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारे, सत्य आणि विकासावर आधारित राजकारण उभे करण्याची गरज व्यक्त करत त्यांनी युवकांनी प्रथम स्वतःच्या पायावर उभे राहून स्वाभिमानाने समाजकारण व राजकारणात सहभागी व्हावे.भारत हा जगातील सर्वात मोठी तरुण लोकसंख्या असलेला देश आहे. मात्र प्रत्यक्ष काम करताना राजकीय नेतृत्वाचे संपूर्ण लक्ष मतांच्या राजकारणावर केंद्रित झाल्याचे दिसते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वास्तव प्रश्नांकडे पाहण्याची मानसिकता कमी होत चालली आहे.ग्रामीण भागात बेरोजगारीमुळे ३० ते ३५ वर्षांच्या अनेक तरुणांना रोजगार मिळत नसल्याने त्यांच्या विवाहाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अनेक गावांमध्ये शेकडो तरुण अविवाहित आहेत. अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याइतकीच विवाह ही जीवनातील नैसर्गिक गरज आहे.
तरुणांच्या आयुष्याची व्यवस्था करण्याचा प्रामाणिक प्रयत्न
या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे सामाजिक परिणाम भविष्यात गंभीर स्वरूपात समोर येऊ शकतात.अनेक राजकीय नेत्यांना स्वतःमागे बेरोजगार तरुणांच्या टोळ्या फिराव्यात असे वाटते; मात्र त्या तरुणांच्या आयुष्याची व्यवस्था करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात नाही. तरुणांचा केवळ राजकीय वापर न करता त्यांच्या भवितव्याचा विचार करणे आवश्यक आहे.स्वतःच्या पायावर उभा असलेला कार्यकर्ता स्वाभिमानाने काम करू शकतो; अन्यथा तो लाचार बनतो आणि त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. अशा लाचार कार्यकर्त्यांची फौज निर्माण होणे ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक दीपक पवार, सूत्रसंचालन गणेश सरोदे व अपर्णा शेळगावकर यांनी करून आभार सचिन नागपुरे यांनी मानले.
यांची उपस्थिती
याप्रसंगी सुशिला मोराळे, प्रभावती ढाकणे,नितीन काकडे, शिवशंकर राजळे, बंडू पाटील बोरुडे, गहिनीनाथ शिरसाट, देवा पवार,सविता भापकर, मंगल सोनटक्के, योगिता राजळे,योगेश रासने, हरीश भारदे, सिताराम बोरुडे, डॉ. राजेंद्र खेडकर, शरद सोनवणे, सुरेश हंडाळ, विष्णू ढाकणे,दत्ता खेडकर, दिगंबर गाडे, बबलू वावरे, सुमित तरवडे,देविदास देशमुख, चंद्रकांत भापकर,अनिल ढाकणे,हुमायून आतार,बन्सी आठरे, रामराव चव्हाण, बाळासाहेब सोनटक्के, सचिन नागापुरे, दीपक पवार,किरण रहाणे, रत्नमाला उदमले, आरती निऱ्हाळी आदी उपस्थित होते.



