
Ahilyanagar District Cooperative Bank Election : नगर : जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची निवडणूक (Ahilyanagar District Cooperative Bank Election) राजकीय दृष्या गाजत असतानाच आता दुष्काळी परिस्थितीच्या कारणास्तव ही निवडणूक बिनविरोध (Election Uncontested) करण्यासाठी नेत्यांनी आवाहन करायला सुरुवात केली आहे. त्यानुसार खरोखरच निवडणूक बिनविरोध झाली तर बँकेचा निवडणुकीवर होणारा सुमारे 15 लाखांचा खर्च वाचणार आहे. शिवाय राजकीय चुरशीमुळे नेत्यांना करावा लागणारा कोट्यवधी रुपयांचा खर्चही वाचणार आहे. तर दुसरीकडे मतदान किंवा बिनविरोध निवडणूक सध्याच्या वातावरणात नकोच, वातावरण निवळल्यानंतरच ती व्हावी, असाही सूर उमटत आहे.
बँकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण
बँकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. अंतिम मतदार यादीही जाहीर झाली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सहकार विभागाकडून ऑक्टोबर महिन्यात निवडणूक घेतली जाऊ शकते, असा अंदाज आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आतापर्यंत बँकेच्या राजकारणात नसलेली मंडळीही इच्छुक(Ahilyanagar District Cooperative Bank Election)
यावर्षी ही निवडणूक होण्याआधीच राजकीय दृष्टया गाजली. जिल्ह्यातील सगळेच दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आतापर्यंत बँकेच्या राजकारणात नसलेली मंडळीही यात आली. विविध पॅनल, छुप्या युत्या-आघाड्यांची चर्चाही झाली. हक्काचे मतदार कोण, त्यांची जमवाजमवही सुरू झाली.
एका बाजूला असे राजकारण सुरू असताना दुसरीकडे आता काही नेत्यांनी यावर समजुतीची भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सुरवातीला ही भूमिका मांडली. आता अशीच भूमिका ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनीही मांडली आहे.
जर बँकेची निवडणूक बिनविरोध झाली, तर यासाठी होणारा सुमारे 15 लाखांचा खर्च वाचू शकेल. बँकेला निवडणूक घेण्यासाठी ही रक्कम सहकारी निवडणूक आयोगाकडे भरावी लागते. तर दुसरीकडे निवडणूक बिनवविरोध झाली, तर नेत्यांचा प्रचार, यंत्रणा, कार्यकर्ते आणि एकूणच खर्च वाचणार आहे. जेवढी चुरस जास्त, तेवढा हा खर्च जास्त असतो. त्यामुळे हा कोट्वधी रुपयांचा नेत्यांचा खर्चही वाचणार आहे.
याचे राजकीय परिणामही होणार आहेत. बँकेच्या निमित्ताने होणारे शक्तिप्रर्दशन टळणार आहे. त्यामुळे कोण किती पाण्यात आहे, ही झाकली मूठ कायम राहणार आहे. याशिवाय राजकीय कटुता, एकाच पक्षात होणारी संभाव्य उघड फूटही टळणार आहे.
असे असले तरी सध्याच्या वातावरणात ही निवडणूक नकोच, असेही काहींचे मत आहे. निवडणूक बिनविरोध झाली, तरी खऱ्या अर्थाने प्रत्येकाला संधी मिळणार आहे का, बिनविरोध उमेदवार निवडताना सध्या निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सध्याचे वातावरण निवळल्यानंतरच जो निर्णय घ्यायचा तो घेतला जावा, असा एक मतप्रवाह आहे.


