Ahilyanagar News Update | नगर : जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात तब्बल २८ निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. धर्म विचारुन पर्यटकांना मारणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हिंदूंना (Hindu) जाणीवपूर्वक टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाकिस्तानवर (Pakistan) पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादाचा समूळ नाश करावा व पाकिस्तानला धडा शिकवा, अशी मागणी अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरासह जिल्हाभरातून होत आहे.
हे वाचा – विद्यार्थी वसतीगृहाच्या उभारणीसाठी प्रस्ताव सादर करा : ललित गांधी
जिल्हाभर आंदोलने (Ahilyanagar)
बुधवारी अहिल्यानगर शहरासह जिल्हाभरात अनेक आंदोलन करण्यात आली. यामध्ये पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. तसेच पाकिस्तानच्या निषेधार्थ घोषणाही देण्यात आल्या. जम्मू काश्मीरमधील घटनेनंतर अहिल्यानगर शहरातील शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला असून त्यांनी शहरातील दिल्लीगेट समोर निषेध आंदोलन केले. पारनेर तालुक्यातील सुपा येथे पारनेर तालुका भारतीय जनता पक्षातर्फे टायर जाळून निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अहिल्यानगरतर्फे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या घटनेचा निषेध करण्यात आला. संगमनेर येथील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानकासमोर जुन्या नाशिक-पुणे महामार्गावर उतरत जोरदार घोषणाबाजी करून निषेध केला.
अवश्य वाचा – शेवगावात ऑनलाईन बिंगो जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा
हल्लेखोरांना कंठस्नान घालण्याची मागणी (Ahilyanagar)
अहिल्यानगर शहरातील वंदे मातरम युवा प्रतिष्ठान व कापड बाजार व्यापारी असोसिएशनच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. केंद्र शासनाने हल्लेखोरांना लवकरात लवकर कंठस्नान घालावे, अशी विनंती वंदे मातरम युवा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली. अहिल्यानगर शहरातील सकल हिंदू समाजातर्फे शहरातील माळीवाडा चौकात निषेध करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने हिंदू युवक उपस्थित होते. शेवगाव येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने शेवगावमधील क्रांती चौकामध्ये जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. तसेच पाकिस्तानच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
श्रीरामपूर येथेही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महात्मा गांधी पुतळा येथे पाकिस्तानचा झेंडा जाळला. तसेच नगर शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनेही या घटनेचा निषेध करण्यात आला. अकोलेकरांनी बसस्थानक परिसरात निषेध सभा घेऊन शहरातून कॅण्डल मार्च काढला. यावेळी आतंकवाद्यांच्या व पाकिस्तानच्या प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन करीत निषेध केला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी होणाऱ्या आंदोलनातून पाकिस्तान विरोधात संताप व्यक्त होत असून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होत आहे.