
AI Summit : नगर: भविष्यातील तंत्रज्ञान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) बाबत ग्रामीण भागात जनजागृती करण्यासाठी सावेडी येथील माऊली संकुल येथे आज (ता. २४) ‘ग्रामीण एआय समिट’चे आयोजन करण्यात आले. नितीन उदमले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या परिषदेने जिल्ह्याच्या अहिल्यानगरच्या तंत्रज्ञान क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे.
हेही वाचा : ‘पनीर’च्या नावाखाली होणारी फसवणूक थांबणार; नवीन नियमावली काय?
यांची उपस्थिती
या सोहळ्याचे उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. कार्यक्रमात प्रशासकीय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील खालील मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कृषी पणन, संचालक शरद जरे, द डेटा टेक लॅब्जचे सीईओ डॉ. अमित आंद्रे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कालुबर्मे यांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली.
नक्की पहा : भूमिपूजनानंतरच रस्ता खराब; ४० लाखांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
ग्रामीण विकासाला ‘एआय’ची जोड (AI Summit)
या एकदिवसीय परिषदेत तज्ज्ञांनी शेती, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांत एआयमुळे होणाऱ्या बदलांवर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रामुख्याने ग्रामीण भागातील तरुणांना घरबसल्या रोजगाराच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, यावर मंथन करण्यात आले. केवळ चर्चाच नव्हे तर एआय टूल्सचे ‘लाईव्ह डेमोस्ट्रेशन’ हे या समिटचे मुख्य आकर्षण ठरले. अशी एआय परिषद पहिल्यांदाच अहिल्यानगरमध्ये आयोजित केल्यामुळे स्थानिक विद्यार्थी आणि उद्योजकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. सकाळपासूनच माऊली संकुल येथे तंत्रज्ञानप्रेमींची मोठी गर्दी झाली होती. या उपक्रमामुळे अहिल्यानगरच्या स्टार्टअप संस्कृतीला आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले आहे.


