Alex Cup | नगर : येथील भुईकोट किल्ला येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ॲलेक्स कप (Alex Cup) फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुलमोहर एफसीने फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेड एफसीवर 2-0 असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले. गुलमोहर एफसीकडून पार्थ मस्कर याने दोन्ही गोल करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
हे वाचा – गावातच मिळत आहेत शासकीय सेवा; नागरिकांचा मानसिक ताण होतोय कमी

पारितोषिक वितरण समारंभ (Alex Cup)
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशन, अहिल्यानगरचे मानद सचिव व स्व. ॲलेक्स फर्नांडिस यांचे सुपुत्र रोनप फर्नांडिस, फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष खालिद सय्यद, संयुक्त सचिव प्रदीप जाधव, कार्यकारिणी सदस्य व्हिक्टर जोसेफ, राजू पाटोळे, पल्लवी सैंदाणे आणि झोएब खान उपस्थित होते.
अवश्य वाचा- साखरपुड्यातील १७ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड; मध्यप्रदेशातून मुद्देमाल हस्तगत

वाद न घालता खेळलेला खेळ (Alex Cup)
स्पर्धेच्या आयोजनासाठी फिरोदिया शिवाजियन्सचे सदस्य जेव्हिअर स्वामी, सचिन पात्रे, राजेश अँथनी आणि अभिषेक सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच वरिष्ठ खेळाडू अभय साळवे, मयूर गोरखा, साहिल कुसळकर, तसेच उत्कर्ष सोनवणे, नील धेंडवाल, जोएल पात्रे आणि इतर खेळाडूंच्या योगदानाचे क्लबतर्फे विशेष कौतुक करण्यात आले.
विजयी व उपविजयी ठरलेल्या संघांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते चषक व रोख बक्षिस देण्यात आले. यासह स्पर्धेतील वैयक्तिक पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू: नील धेंडवाल (फिरोदिया शिवाजियन्स युनायटेड), सर्वोत्कृष्ट गोलरक्षक: उनाध्य जाधव (गुलमोहर एफसी) यांना देखील विशेष सन्मानित करण्यात आले. अंतिम सामन्याचे पंच म्हणून जोनाथन जोसेफ, सुयोग महांगडे, ऋषभ मणी आणि प्रियांका आवारे यांनी काम पाहिले.

यावेळी बोलताना रोनप फर्नांडिस यांनी “खेळ म्हणजे शिस्त” असून सर्व संघांनी कोणताही वाद न घालता खेळलेला खेळ हा खेळाडूंमधील शिस्तीचा उत्तम नमुना असल्याचे सांगितले. संयुक्त सचिव प्रदीप जाधव यांनी लवकरच अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनची लीग सुरू होणार असल्याची माहिती देऊन सीआरएस नोफ्लदणी करण्याचे आवाहन केले. स्पर्धेतील विजयी, उपविजयी संघाचे प्रायोजक तसेच अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया आणि वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी सैंदाणे यांनी करुन आभार मानले.
गुलमोहर एफसी विरुध्द फिरोदिया शिवाजियन्स युनायटेड एफसी यांच्यात अत्यंत चुरशीचा झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच गुलमोहर एफसीने आक्रमक खेळी करत प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्माण केला. सामन्याच्या 7 व्या मिनिटाला पार्थ मस्कर याने शानदार गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमक चाली रचत 12 व्या मिनिटाला दुसरा गोल झळकावून फिरोदिया शिवाजीयन्स युनायटेड एफसीसमोर मोठे आव्हान उभे केले.
हे पहा – सोन्यापेक्षा चांदीत गुंतवणूक ठरेल गेमचेंजर…
दोन गोलने पिछाडीवर पडल्यानंतर फिरोदिया शिवाजियन्स संघाने पुनरागमनासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र गुलमोहर एफसीच्या भक्कम बचावफळी समोर त्यांची एकही रणनीती यशस्वी ठरली नाही. शेवटपर्यंत गोल करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करूनही त्यांना खाते उघडता आले नाही. पार्थ मस्करच्या दमदार दुहेरी गोलच्या जोरावर गुलमोहर एफसीने 2-0 असा दणदणीत विजय मिळवत प्रतिष्ठेचा ॲलेक्स कप आपल्या नावावर केला.



