
Amit Shah Pune Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या 1 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी अमित शाह पुण्यात येणार असून, या कार्यक्रमाला काही राजकीय पक्ष आणि संघटनांनी विरोध दर्शवला आहे. त्यात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही उडी घेत, अमित शाह यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे.
हेही वाचा: कृषी समृद्धी योजनेसाठी 2 हजार कोटींची तरतूद; आ. विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश
पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी अमित शाह यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी आमंत्रित करण्यात आल्याबद्दल आक्षेप घेतला. त्यांनी पुणेकरांना या कार्यक्रमाचा निषेध करण्याचे आवाहन करत, जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अशा व्यक्तीचा सत्कार होणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
‘पुणेकरांनी विरोध केला पाहिजे’ (Amit Shah Pune Visit)
राऊत म्हणाले, “ज्यांच्यावर तरुण विद्यार्थ्यांवर लाठीमार आणि गोळीबारासारख्या कारवाईचे आरोप होत आहेत, अशा व्यक्तीचा लोकमान्य टिळकांच्या नावाने सन्मान होणे ही गंभीर बाब आहे. पुणेकरांनी आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांनी या कार्यक्रमाचा निषेध करावा.”
जंतरमंतरवरील कारवाईवरून अमित शाह लक्ष्यावर (Amit Shah Pune Visit)
दिल्लीतील जंतरमंतर परिसरात आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापराच्या मुद्द्यावरून राऊत यांनी अमित शाह यांच्यावर थेट निशाणा साधला. “पूर्वी जालियनवाला बागेत जनरल डायर पाहिला होता, आता जंतरमंतरवर ‘जनरल कायर’ पाहिला,” असा उपरोधिक टोला लगावत त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
त्यांच्या मते, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारची कारवाई लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देणारी आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारली पाहिजे.
‘लापता गृहमंत्री’ असा उपरोधिक उल्लेख (Amit Shah Pune Visit)
अमित शाह यांच्या सार्वजनिक भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत राऊत म्हणाले, “जंतरमंतरवर त्यांच्या नावाने एवढा मोठा कांड घडला, देशभरात या प्रकरणावर चर्चा सुरू आहे, विरोधी पक्ष यावर सातत्याने लोकसभेत प्रश्न विचारत आहेत, तरी गृहमंत्री कुठे आहेत? असे राऊत म्हणाले. “पूर्वी ‘लापता लेडीज’ नावाचा चित्रपट आला होता, आता मी ‘लापता गृहमंत्री’ नावाचा चित्रपट बनवण्याचा विचार करतोय, असा टोलाही त्यांनी शहांवर लावला.
संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या जीडीचा उल्लेख
राऊत यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या जनरल डायरीचा (GD) उल्लेख करत दावा केला की, पॅलेट गन आणि अश्रूधुराच्या नळकांड्यांच्या वापराबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशांची नोंद संबंधित कागदपत्रांमध्ये आहे. ते म्हणाले, “दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश असल्याने पोलिसांवरील अंतिम जबाबदारी केंद्र सरकारची असते. त्यामुळे विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी केंद्रीय गृहमंत्र्यांवर येते. त्यामुळे विद्यार्थ्यांवर झालेला हा लाठीचार्ज आणि गोळीबार अमित शाह यांच्याच आदेशाने झाला आहे.” असे राऊत म्हणाले.
नक्की वाचा: कळसूबाई शिखराच्या एका भागाचे भुस्खलन; मोठी दुर्घटना टळली, गांगडवाडीचे मोठे नुकसान
पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यांचाही संदर्भ
राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलताना राऊत यांनी पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यांचाही उल्लेख केला. त्या घटनांनंतरही गृहमंत्र्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते, त्यावेळेसच त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता, त्यावेळी राष्ट्रीय सुरक्षेचा विषय म्हणून विरोधी पक्षाने अनेक वेळा संयम बाळगला. मात्र आता घडणाऱ्या घटनांची जबाबदारी निश्चित केलीच पाहिजे, असा दावा करत त्यांनी केंद्र सरकारच्या सुरक्षा धोरणावर टीका केली.
जितेंद्र सिंह यांच्या वक्तव्यावर आक्षेप
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी “जंतरमंतरवर गोळीबार झालाच नाही” असे सभागृहात म्हटल्याचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, अधिकृत पोलिस नोंदींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. संसद मार्ग पोलीस ठाण्याची जनरल डायरी खोटे बोलत नाही. योग्य वेळी त्या नोंदी सार्वजनिक होतील, असा दावा त्यांनी केला.
‘दोन्ही परिस्थितीत जबाबदारी गृहमंत्र्यांची’
राजीनाम्याच्या मागणीचे समर्थन करत राऊत म्हणाले, “जर पोलिसांनी गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवर कारवाई केली असेल, तर त्याचा अर्थ प्रशासनावरील त्यांचे नियंत्रण कमी झाले आहे. आणि जर आदेश त्यांच्या स्तरावरून दिले गेले असतील, तर त्या कारवाईची थेट जबाबदारी त्यांच्यावर येते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अमित शाह यांनी पदाचा राजीनामा द्यावा.”
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरही भाष्य
याच पत्रकार परिषदेत राऊत यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवरही प्रतिक्रिया दिली. त्यांनी दहाव्या अनुसूचीतील (Anti-Defection Law) तरतुदींचा उल्लेख करत, निष्पक्ष निर्णय झाल्यास एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न निर्माण होईल, असा दावा केला.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्ह व पक्षसंघटनेबाबत झालेल्या निर्णयांवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “घटनेच्या चौकटीत निर्णय झाला, तर सत्य बाहेर येईल,” असे ते म्हणाले. दरम्यान, अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा आणि संभाव्य आंदोलनांच्या इशाऱ्यामुळे 1 ऑगस्ट रोजी पुण्यातील राजकीय घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
अवश्य वाचा: कृती सेननने व्यक्त केली या पॅन इंडिया सुपरस्टारसोबत काम करण्याची इच्छा


