नगर : राज्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राळेगण सिद्धी (Ralegan Siddhi) या गावासाठी विशेष दुष्काळ निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे. तात्पुरत्या उपायांऐवजी संपूर्ण गावाला केंद्रस्थानी ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने दुष्काळाचा सामना करण्याची दुष्काळाची ही संकल्पना आहे. इतर सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनीही असा पुढाकार घ्यावा,असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी केले. गावातील स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी ट्रस्टच्या बैठकीत ते बोलत होते.
नक्की वाचा : लग्नाच्या आमिषाने तीन तरुणांची १४ लाखांची फसवणूक; विवाहांचे बिंग फुटले
विशेष ग्रामसभा बोलावून निर्णय होणार (Anna Hazare)
जनावरांच्या चाऱ्याच्या खर्चात गावाचा ५० टक्के सहभाग, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जनावरांची संख्या आणि जलस्रोतांबाबत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. आता विशेष ग्रामसभा बोलावून त्यात सविस्तर चर्चा केली जाणार आहे. राळेगण सिद्धीने जलसंधारणाच्या क्षेत्रात देशासमोर आदर्श निर्माण केला आहे. या संकटावरही गावकरी एकजुटीने मात करतील. प्रत्येक नागरिकाला पाणी बचतीची शपथ दिली जाणार आहे. हा लढा एकट्याचा नसून संपूर्ण राळेगण परिवाराचा आहे, असे अण्णा हजारे यांनी सांगितले आहे.
अवश्य वाचा : भगवानगडाचे चौथे महंत कृष्णा महाराज शास्त्री नेमके कोण?

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सामाजिक कार्यासाठी देश- विदेशांतून अनेक पुरस्कार मिळाले आहेत. याच पुरस्कारांच्या रकमेतून मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी आदर्श व्यक्तींना ‘अण्णा हजारे सामाजिक गौरव पुरस्कार’ दिले जातात. मात्र, यंदा दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पुरस्कारांसाठी खर्च होणारी रक्कम दुष्काळ निवारणासाठी वापरण्याचा संकल्प हजारे यांनी केला आहे. यंदाच्या पुरस्कारांवर होणारा सुमारे २० लाख रुपयांचा खर्च हा दुष्काळ निवारणासाठी वापरण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं असून इतर सामाजिक संस्थांनीही राज्यातील दुष्काळासंबंधी असे निर्णय घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केलं आहे.
आराखडा नेमका कसा? (Anna Hazare)
दुष्काळावर मात करण्यासाठी राळेगणसिद्धी गावाने वॉटर बजेट आराखडा तयार केलाय. या आराखड्यानुसार गावातील एकही जनावर विकले जाणार नाही. गावातील सर्व पशुधनाची अचूक गणना केली जात आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत प्रत्येक जनावराला पुरेसा चारा आणि पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. गावाच्या लोकसंख्येनुसार प्रत्येक ग्रामस्थाला दररोज किती पाणी लागते, याचा ताळेबंद तयार करण्यात आला आहे. पाण्याचा अपव्यय पूर्णपणे रोखून समन्यायी पद्धतीने वाटप केले जाणार आहे. माणसे आणि जनावरांच्या पाण्याची एकत्रित गरज लक्षात घेऊन विहिरी व कूपनलिकांमधून गरजेपुरताच पाण्याचा उपसा केला जाणार आहे. असा हा आराखडा आहे.



