Book Controversy : प्रशांत आंबी पोलिसांकडून स्थानबद्ध; ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून नाट्यमय घडामोडी

0
Book Controversy : प्रशांत आंबी पोलिसांकडून स्थानबद्ध; 'शिवाजी कोण होता?' पुस्तकावरून नाट्यमय घडामोडी
Book Controversy : प्रशांत आंबी पोलिसांकडून स्थानबद्ध; 'शिवाजी कोण होता?' पुस्तकावरून नाट्यमय घडामोडी

Book Controversy : नगर : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखीत ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी हे आज (ता. २८) शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या घरासमोर जाऊन पुस्तकाचे वाचन करणार होते. मात्र, त्यापूर्वीच बुलढाणा पोलिसांनी प्रशांत आंबी यांना ताब्यात घेऊन स्थानबद्द केले आहे. त्यांनी बुलढाण्यात प्रवेश करताच ही कारवाई करण्यात आली. सध्या त्यांना अज्ञातस्थळी ठेवण्यात आल्याची माहिती आहे.

नक्की वाचा : राघवेंद्र स्वामी मंदिराच्या विश्वस्तावर खूनी हल्ला; गुन्हा दाखल

नेमकं काय घडतंय?

अलीकडेच आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखावरुन प्रशांत आंबी यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याचा निषेध करण्यासाठी रोहित पवार यांच्या नेतृत्त्वात आज बुलढाण्यात मोर्चा काढला जाणार होता. तसेच संजय गायकवाड यांच्या घरासमोर ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे जाहीर वाचन केले जाणार होते. सध्या विविध जिल्ह्यातून बुलढाण्यात अनेक पुरोगामी विचारसरणीचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत. मात्र, पोलिसांनी आता प्रशांत आंबी यांना स्थानबद्द करुन कारवाईला सुरुवात केली आहे. शेतकरी नेते अजित नवले यांनी या गोष्टीचा निषेध केला आहे. शिवाजी कोण होता? आयोजित सभेचा मंडप ठेकेदाराला काढायला लावण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याचे जार सुद्धा परत नेण्यात आले आहेत.

नक्की पहा : गुप्तधनाच्या लालसेचा खेळ? खड्ड्यामुळे गावात भीतीचे वातावरण

संजय गायकवाड आक्रमक (Book Controversy)

संजय गायकवाड यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांची आडमुठेपणाची भूमिका कायम असल्याचे दिसून आले. त्यांनी म्हटले की, आम्ही आज त्या पुस्तक वाचनाला जाणार आहोत. आम्ही तिकडे जाऊन खाली बसू आणि विनयशीलतेने सगळं ऐकून घेऊ. पुस्तकवाचनावेळी जर त्यांनी महाराजांचा योग्य सन्मान केला तर आम्ही टाळ्या वाजवून त्यांच्या स्वागत करु. त्या पुस्तकात ३००-४०० वेळा शिवाजी, शिवाजी असे लिहिले आहे, त्यांनी वाचनावेळी प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराज म्हणावे. आमच्या सगळ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आणि शिवभक्तांच्या भावांना अनावर झाल्या तर याची सगळी जबाबदारी त्या पुस्तक वाचनाच्या आयोजकाची आणि पुस्तक वाचणाऱ्याची असेल, असा गर्भित इशारा संजय गायकवाड यांनी दिला.