Bribery : नगर : पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे याला एक लाख रुपये लाचेची (Bribery) मागणी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Bureau) पथकाने नाशिकमधून ताब्यात घेतले. गांगुर्डे हा अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात (Taluka Police Station) कार्यरत आहे.
गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी २ लाखांची मागणी
तक्रारदाराचे मामा व इतर १५ आरोपीविरोधात तालुका पोलीस ठाण्यात ११ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात एकाच कुटुंबातील व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे याच्याकडे होता. या गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी व नातेवाईकांची नावे वगळण्यासाठी गांगुर्डे याने सुरुवातीला २ लाख रुपये लाचेची मागणी केली होती.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पंचासमक्ष तक्रारीची केली पडताळणी (Bribery)
या विरोधात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. विभागाच्या पथकाने पंचासमक्ष या तक्रारीची पडताळणी केली. शहरातील पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या संभाषणादरम्यान गांगुर्डे याने तडजोडीअंती एक लाख रुपये लाच घेण्याचे मान्य केले. लाचेची रक्कम पोलीस मुख्यालय परिसरात स्वीकारण्याचे निश्चित झाले होते.
त्यानंतर गांगुर्डे नाशिकला निघून गेला. त्याने लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे उघड झाल्याने त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला नाशिकमधून ताब्यात घेऊन अहिल्यानगरला आणण्यात येत आहे. आज (ता. २८) त्याला न्यायालयापुढे हजर केले जाईल. गांगुर्डे हा सहायक पोलीस निरीक्षक पदाच्या पदोन्नतीच्या प्रतीक्षेत होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू आल्हाट, अंमलदार चंद्रकांत काळे, किशोर कुळधर, शेखर वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे करत आहेत.



