
Bronze Medal : पारनेर : अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचा युवा कुस्तीपटू चेतन शिवाजी रेपाळे याने आग्रा (Agra) (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या वरिष्ठ गट फ्रीस्टाइल राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी करत कांस्यपदक (Bronze Medal) पटकावले. भारतीय कुस्तीगीर संघाचे माजी अध्यक्ष व खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले. चेतन रेपाळेच्या (Chetan Repale) या यशामुळे पारनेर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शिवछत्रपती कुस्ती संकुल, पारनेरच्या शिरपेचातही आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
पुणेवाडी येथील चेतन रेपाळे हा नगरसेवक युवराज पठारे यांचा भाचा असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१८ पासून शिवछत्रपती कुस्ती संकुलात कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे. सध्या तो १२५ किलो वजन गटात कुस्ती खेळतो.
नक्की वाचा : कर्मचारी सर्वंकष माहितीकोष 2026 अद्ययावत करण्याचे आवाहन
यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश
चेतनने यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ मध्ये त्याने कांस्यपदकाची कमाई केली. तसेच शेवगाव येथे झालेल्या देवाभाऊ केसरी स्पर्धेत पुण्याच्या कौतुक डफडे याला ७-५ अशा गुणांनी पराभूत करत विजेतेपद पटकावले. या विजयाबद्दल त्याला चांदीची गदा व रोख पारितोषिक देण्यात आले. पाथर्डी येथे झालेल्या राजे छत्रपती कुस्ती स्पर्धेत धुळेच्या हृतिक राजपूत याला ५-० ने पराभूत करून त्याने उत्तर महाराष्ट्र केसरी किताबही जिंकला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
चेतनचे सर्वत्र अभिनंदन (Bronze Medal)
४ नोव्हेंबर २०२६ रोजी वारजे (पुणे) येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची आग्रा येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. राष्ट्रीय स्तरावर कांस्यपदक मिळवत त्याने आपल्या गुणवत्तेची पुन्हा एकदा छाप पाडली. चेतनच्या या यशामागे त्याचे कठोर परिश्रम, जिद्द, नियमित सराव आणि युवराज पठारे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावर मजल मारणाऱ्या चेतनचे सर्वत्र अभिनंदन होत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले आहे.


