नगर : राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ (Oath) घेतली. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन (C.P. Radhakrishnan) यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना स्थान देण्यात आले. छगन भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात येण्याची शक्यता आहे.आज मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. त्यात भुजबळ मंत्री म्हणून सहभागी होतील.
नक्की वाचा : खगोल शास्त्रातील तारा निखळला;ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांचं निधन
विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांचा समावेश झाला नव्हता. त्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले होते. त्यांनी उघडपणे आपली नाराजी अनेक वेळा व्यक्त केली होती. मंत्रिपद न मिळाल्यामुळे भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वापासून आणि पक्षीय घडामोडींपासून लांब राहिलेले दिसत होते. आता त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
अवश्य वाचा : ‘कर्जासाठी शेतकऱ्यांकडे सिबिल मागू नका’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकाना फटकारले
कधी झाला निर्णय ?(Chhagan Bhujbal)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्य मंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सात दिवसांपूर्वीच छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्री करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यासंदर्भातील निर्णय भुजबळ यांना कळवला होता. छगन भुजबळ यांनी त्याला दुजोरा देत आपल्याला एका ओळीचा संदेश मिळाल्याचे सांगितले. दरम्यान, सुनील तटकरे यांनी सांगितले की, राष्ट्रवादीची एक जागा रिक्त होती. त्या जागेवर छगन भुजबळ यांना संधी दिली जात आहे.
भुजबळांना का मिळाले मंत्रीपद ? (Chhagan Bhujbal)
छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत. ओबीसी समाजावर त्यांचा प्रभाव आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात महापालिका, नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. त्याकाळात भुजबळांना नाराज ठेवणे राष्ट्रवादी काँग्रेसला परवडणारे नाही. यामुळे भुजबळांना मंत्री करण्यात आल्याची चर्चा आहे.