
Chief Minister Dr. Mohan Yadav : ‘‘पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे चरित्र अद्भुत आणि उज्ज्वल होते म्हणूनच आपल्यासाठी आदर्शवत आहे. महाराष्ट्राच्या महापुरुषांनी देशाला दिशा दिली. त्यांचे सुशासन आणि जीवनकार्य अनेक शतकांपर्यत सर्वाना प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या आशीवार्दानेच सरकारचे काम सुरू असून, गोदा ते नर्मदा यात्रमुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते अधिक दृढ झाले असल्याचे भावोद्गार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव (Chief Minister Dr. Mohan Yadav) यांनी काढले.

नक्की वाचा: पाथर्डीत लाच घेताना दोन पोलीस रंगेहात पकडले; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
डॉ. यादव यांच्या उपस्थितीत यात्रेचा समारोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली आणि आणि जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मभूमीतून आणि गोदा मातेचे उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मधून निघालेली गोदा ते नर्मदा जलयात्रा (Goda to Narmada Jal Yatra 2026) पाच दिवसांच्या प्रवासानंतर काल बुधवारी महेश्वर येथे पोहोचली. अतिशय भारलेल्या मंगलमय वातावरणात मंत्रघोषाच्या जागरात नर्मदा घाटावर डॉ. यादव यांच्या उपस्थितीत यात्रेचा समारोप महाराष्ट्रातील १३०नद्यामधून आणलेले जल नर्मदेमध्ये विसर्जित करण्यात आले. गोदामातेची महाआरती करून चौंडी येथील मातीचा कलश मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ मोहन यादव आणि अहील्यादेवीचे सोळावे वंशज श्रीमंत युवराज यशवंत होळकर बहाद्दूर यांच्याकडे मंत्री विखे पाटील यांच्यासह जलयात्रेत सहभागी झालेल्या मान्यवरांनी सुपूर्त केला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
छत्रपती शिवराय व अहिल्यादेवी यांचा जयजयकार (Chief Minister Dr. Mohan Yadav)
अहिल्यादेवींच्या राजवाड्यासमोर असलेल्या प्रशस्त घाटावर जलयात्रेचा समारोप सोहळा रंगला. नर्मदेच्या विशाल पात्रातून वाहणाऱ्या पाण्यावरचे हलके तरंग, आकर्षक प्रकाशयोजना महाराष्ट्रातून आलेल्या यात्रेकरूंचा वारकरी सांप्रदायाचा उत्साह, छत्रपती शिवराय व अहिल्यादेवी यांच्या जयजयकाराच्या घोषणा, नर्मदाष्टकमचा नाद आणि नर्मदेची आरती यामुळे कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढतच गेली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, पणनमंत्री जयकुमार रावल, होळकर घराण्याचे युवराज यशवंतराव होळकर, खासदार शंकर लालवाणी (इंदूर) व रामराव वडकुते, महेश्वरचे आमदार राजकुमार मेव, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, श्री. उद्धव महाराज मंडलिक, महेश्वर नगरपालिकेचे पदाधिकारी, जलसंपदा खात्याचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मुख्यमंत्री डॉ यादव म्हणाले की,राज्यकर्त्याच्या नात्याने अहिल्यादेवींची भूमिका अद्भुत म्हणावी अशीच आहे. त्या आमच्यासाठी सदैव आदर्श आहेत. आमच्या सरकारला त्यांचाच आशीर्वाद आहे, ‘‘परकीय आक्रमकांचा सामना करण्यास लोक घाबरत होते, त्या काळात अहिल्यामाता लढल्या. त्यांचे राज्य छोटे असेल कदाचित; पण लढण्याचा, लोकहितासाठीच राज्य करण्याचा निर्धार मोठा होता.’’
‘‘श्रीकृष्णाने सांगितलेला कर्मवाद पुण्यश्लोक अहिल्याबाई जगल्या. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपल्याला आदर्श घ्यायला लावणारा आहे. भारतात पूर्व ते पश्चिम आणि उत्तर ते दक्षिण अशा चारही दिशांना त्यांनी नदीकिनारी घाट बांधले. असंख्य देवस्थानांचा त्यांनी जीर्णोद्धार केला. असे प्रत्येक देवस्थान त्यांची गौरवगाथा गात आहे,’’ असे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले.
‘महाराष्ट्र-मध्य प्रदेश जुळे भाऊ’
‘‘महाराष्ट्राचे नुसते नाव घेतले तरी मी रोमांचित होतो. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश जणू जुळे भाऊ आहेत,’’ असे सांगून डॉ. यादव म्हणाले, ‘‘लोकमाता अहिल्याबाईंमुळे आपले नाते होतेच. गोदा ते नर्मदा जलयात्रेमुळे ते अधिक दृढ झाले. सिंहस्थामुळे नाशिक आणि उज्जैन हे तिसरे नाते आहे. महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, शिंदे, होळकर असे अनेक महापुरुष देशाला दिले. त्या सर्वांनी देशाला नवी दिशा दिल्याचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक सांगितले.
जलयात्रेची माहिती देताना श्री. विखे पाटील म्हणाले, ‘‘जलयात्रेच्या माध्यमातून एक लोकचळवळ तयार झाली, ही यात्रेची मोठी फलश्रुती आहे. जलव्यवस्थापन, लोककल्याण, सुशासन यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळखल्या जातात. राज्यकर्त्या म्हणून त्यांनी केलेले काम आजही आमच्यासाठी मार्गदर्शक आहे.’’जलयात्रेमुळे जागरूकता’ ‘पाण्याच्या प्रत्येक थेंबागणिक अधिक उत्पादन’ यासाठी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ही जलयात्रा यशस्वी झाली, असे सांगून श्री. विखे पाटील म्हणाले, ‘‘जलयात्रेच्या निमित्ताने आम्ही महाराष्ट्रातील १३० नद्यांचे पाणी एकत्र केले. त्यातून जलसंवर्धन, पाण्याचा वापर याबद्दल मोठी जागरूकता निर्माण झाली. त्यामुळेच ही जलयात्रा केवळ धार्मिक वा आध्यात्मिक स्वरूपाची सांकेतिक यात्रा बनली नाही. त्यातून पर्यावरणाचे संरक्षण, जलसंवर्धन यावर मंथन झाले.पाणी हे जीवन आहे आणि ऊर्जाही आहे, हे या यात्रेमुळे अनेकांपर्यंत पोहोचले.’’
चौदा कोटी जनतेची जलयात्रा
श्री. विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोदा ते नर्मदा जलयात्रेचे ऐतिहासिक आयोजन झाले, असे कौतुकोद्गार काढून श्री. बावनकुळे म्हणाले, ‘‘मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्री. विखे पाटील यांनी आम्हां सगळ्यांसमोर जलयात्रेची कल्पना मांडली, तेव्हा ती एवढी मोठी होईल, असे वाटले नव्हते. तथापि ही यात्रा व्यापक झाली, महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची ती आपली यात्रा बनली. या माध्यमातून पर्यावरण आणि जलसंधारण याबाबत मोठी जागरूकता निःसंशयपणे झाली.
’’संपूर्ण जग पाणीटंचाईच्या चिंतेने ग्रासले असताना आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जलसंस्कृती वर्धिष्णू करण्याबाबत बोलतात, विचार करतात. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव त्याच रांगेत येतात. त्यांनी आखलेल्या जलगंगा समर्थन यासह अन्य मोहिमा पाहिल्या तर त्यांना मध्य प्रदेशचे ‘जलक्रांतिदूत’ म्हटले पाहिजे, असे श्री बावनकुळे म्हणाले. अध्यात्म, लोककल्याण आणि संस्कृती यांचा पवित्र संगम म्हणजे अहिल्याबाई, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
पडळकर म्हणाले, ‘‘लोकमाता अहिल्यादेवींनी जलव्यवस्थापनातून लोकशाही सुरू केली. त्यांनी प्रजेला ऊर्जा दिली. आज येथे दोन नद्यांचा महासंगम झाला आहे. त्याला तिसरी नदीही मिळाली. ही नदी म्हणजे अहिल्यादेवी!’’ मंत्री जयकुमार रावल यांनी आभार मानले.
सुमारे ८५० किलोमीटरचा प्रवास करून आलेली गोदा ते नर्मदा जलयात्रा बुधवारी दुपारी महेश्वर येथे पोहोचली, तेव्हा नागरिकांनी तिचे उत्साहात स्वागत केले. यात्रेत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्यास अभिवादन केले. तेथून प्रमुख पाहुण्यांसह यात्रा मिरवणुकीने समारोपस्थळी आली. मिरवणुकीच्या मार्गावर सादर करण्यात आलेल्या वेगवेगळ्या लोककला, खेळांनी महेश्वकर नागरिक मंत्रमुग्ध झाले.


