Closure Warning: कर्जत: कृषी विक्रेत्यांच्या रास्त आणि न्यायिक मागण्यांवर कृषी विभागाकडून कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने अहिल्यानगर जिल्ह्यासह कर्जत तालुक्यातील सर्वच कृषी केंद्र चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थतेची व नाराजीची भावना निर्माण होत आहे. तात्काळ मार्ग न निघाल्यास नाईलाजास्तव बेमुदत कृषी केंद्र बंद (Closure Warning) ठेवण्याचा निर्णय कर्जत तालुका सीड्स फर्टिलायजर अँड पेस्टीसाईड्स असोसिएशनने दिला आहे. या आशयाचे निवेदन सोमवारी (ता.२७) कर्जत तहसीलदार रवी सतवन यांना देण्यात आले. राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या व्यवसायातील प्रलंबित अडचणीसंबंधी तसेच न्यायिक मागण्या संदर्भात राज्य कृषी विभाग कोणताही ठोस निर्णय घेत नाही. याबाबत वारंवार सर्व केंद्र चालकांनी आणि संबंधित संघटनांनी पाठपुरावा केला.
अवश्य वाचा- ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ
रसायनिक खतांचा पुरवठा फॉर पद्धतीने करावा (Closure Warning)
मात्र आजमितीस त्यास यश आले नाही. यात कंपन्याकडून रासायनिक खतांचा पुरवठा होताना लिंकिंग बंद करणे, शेजारील राज्यातून येणारे अप्रमाणित एचटीबीटी कपाशी बियाणे प्रतिबंधित करणे, साथी पोर्टलची वापराची विक्रेत्यांना सक्ती करणे यासह रासायनिक खतांचा पुरवठा फॉर पद्धतीने करावा, खतांच्या मिळकतीमध्ये वाढ करावी, पॅकबंद बियाणे विक्री केल्यास ते बियाणे फेल गेल्यास विक्रेत्यांस आरोपी न करता त्यांना साक्षीदार म्हणून मान्यता मिळावी, राज्याच्या कृषी विभागाकडून गुणवत्ता तपासणीसाठी भरलेल्या नमुना रकमा शासनाकडून विक्रेत्यास मिळावे, तसेच विक्री केंद्राची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या १५ वरून कमी करण्यात आली त्याची अधिसूचना कायम करण्यात यावी. खरीप हंगाम २०२६ मध्ये राज्यातील युरीया व डीएपी खतांची वितरणबाबतची कार्यपद्धती सूचना परिपत्रकाचा फेरविचार करावा, मुदतबाह्य कीटकनाशके पुरवठा कंपन्यांनी विक्रेत्याकडून परत घ्यावे आणि केंद्र शासनाच्या कृषी विभागाकडून नवीन बियाणे कायदा २०२५ मधील विक्रेत्यांसाठी जाचक नियम व अटी शिथिल करावे, या मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्हा कृषी केंद्र चालक सोमवारपासून बेमुदत कृषी केंद्र बंद ठेवण्याच्या पवित्र्यात असून यास कर्जत तालुका सीड्स फर्टिलायजर अँड पेस्टीसाईड्स असोसिएशन देखील आपला पाठींबा जाहीर करीत आहे.
नक्की वाचा- हवामान बदलावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी कमी पाण्याची पिके घ्यावीत : खताळ
तोडगा न निघाल्यास बंदचा इशारा (Closure Warning)
आठ दिवसांत वरील मागण्यांवर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास ठोस निर्णय येईपर्यंत आमची दुकाने बंदच राहतील असा इशारा कर्जतच्या कृषी केंद्र चालकांनी दिला. यावेळी कर्जतचे तहसीलदार रवी सतवन यांना निवेदन देताना कर्जतचे अध्यक्ष विक्रम गदादे, सचिव प्रफुल्ल बरबडे, जिल्हा उपाध्यक्ष पोपट सुद्रीक, संकेत पाटील, नितीन भोईटे, सुभाष गांगर्डे, खजिनदार विशाल फडतरे, उपमन्यू शिंदे, दत्तात्रय भोसले, पंडित होले, हनुमंत उकले, भाऊसाहेब धोदाड, अजिंक्य मेहेत्रे, अविनाश गोरे, अशोक झगडे, अक्षय ढेरे, अजय खराडे, अमोल मेहेत्रे, सागर सरडे, अमर धांडे, राजू खरात, पृथ्वीराज शेंडगे आदी उपस्थित होते.



