
Complaint filed : पाथर्डी : सोशल मीडियावर (Social media) रील बनवून प्रसिद्धी मिळविणारेच लुटारू (Robber) निघाल्याचा धक्कादायक प्रकार पाथर्डी तालुक्यातील शेकटे फाट्याजवळ घडला. पाथर्डी-कोरडगाव रस्त्यावर दुचाकीने प्रवास करणाऱ्या मायलेकांना दोन दुचाकींवरून आलेल्या चौघांनी अडवून मारहाण केली. त्यानंतर आईच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील सोन्याचे दागिने, नऊ हजार रुपयांची रोकड आणि मित्राची दुचाकी असा एकूण ६९ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने नेल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सुजित चौधर, कोमल काळे आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध पोलिसांत फिर्याद देण्यात (Complaint filed) आली आहे.
नक्की वाचा : पारनेरमध्ये टंचाईच्या काळातही मुबलक पाणी; प्रशासनाच्या कामकाजाचे नागरिकांकडून कौतुक
रस्त्यात वाहन आडवे लावून थांबविले
याबाबत पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, तिसगाव येथील दीपक योसेफ गरुड (वय २३) हा टेम्पोचालक असून, तो आई मैना गरुड यांच्यासोबत गुरुवारी (दि. २२) सायंकाळी सोनोशी येथे मावशीच्या घरी जाण्यासाठी निघाला होता. त्याच्या आईने बँकेकडून घेतलेल्या कर्जातील सात हजार रुपये काढून घरी आणले होते. हे पैसे सोबत घेऊन मायलेक मित्राच्या दुचाकीवरून प्रवास करीत होते. रात्री साडेआठच्या सुमारास त्यांची दुचाकी शेकटे फाट्याजवळ आली असता, मागून आलेल्या दुचाकीवरील पुरुष आणि महिलेने त्यांना रस्त्यात वाहन आडवे लावून थांबविले. त्याचवेळी दुसऱ्या दुचाकीवरून आणखी दोघे तेथे आले. त्यानंतर चौघांनी मायलेकांना दुचाकीवरून खाली उतरविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
दीपकला पकडून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद (Complaint filed)
फिर्यादी दीपक याने पल्सरवरील पुरुष व महिलेला सोशल मीडियावरील रीलमधून ओळखत असल्याचे सांगितले. त्याने त्यांची नावे सुजित चौधर आणि कोमल काळे अशी नमूद केली आहेत. यानंतर कोमल काळे हिने आई मैना गरुड यांच्या पर्समधील सात हजार रुपये काढून घेतले. तसेच त्यांना पकडून गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील सोन्याची फुले काढून घेतल्याचा आरोप आहे. दरम्यान, सुजित चौधर याने दीपकच्या तोंडावर दोन ते तीन चापटा मारून त्याच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी दीपकला पकडून ठेवल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर चौघांनी मित्राची दुचाकीही घेऊन घटनास्थळावरून पलायन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
घटनेनंतर दीपक याने तातडीने डायल ११२ वर संपर्क साधला. काही वेळात पाथर्डी पोलिसांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर मायलेक पोलिसांसोबत पोलीस ठाण्यात आले. मारहाणीत दोघांनाही मुक्का मार लागल्याने दवाखान्यात जाण्याची गरज असल्याचे दीपक याने फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेत सात हजार रुपये आईकडील रोकड, दोन हजार रुपये फिर्यादीकडील रोकड, अंदाजे २० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, २० हजार रुपयांची सोन्याची फुले आणि २० हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण ६९ हजार रुपयांचा ऐवज गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.सोशल मीडियावरील रीलमधून ओळख पटलेल्या व्यक्तींवरच लुटमारीचा आरोप झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


