Crime : नगर : सोनईजवळील गणेशवाडी येथे अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर कारवाई करीत तीन ब्रास वाळू व तीन मोबाईल असा एकूण १८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. स्थानिक पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा : चितळवाडीत ग्रामसभा न झाल्याची तक्रार; गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
१८ लाखांचा मुद्देमाल जप्त
या पथकाला सोनई-गणेशवाडी रस्त्यावरील गणेशवाडी शिवारात अवैधरित्या वाहनातून वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने गणेशवाडी शिवारातील हॉटेल कैलासजवळ सापळा रचून तीन वाहने पकडली आहेत. यात ८ लाख रुपये किमतीचा वाहन (क्रमांक एम एच २० ईएल ७९९०), दुसरे वाहन नंबर नसलेले ५ लाख रुपये किंमतीचा पिकअप व पाच लाख रुपये किमतीचा बोलेरो पिकअप (क्रमांक एम एच १६ एई ३२३५) तसेच प्रत्येक वाहनात १० हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू व १० हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन असा एकूण १८ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या वाहनांच्या चालकांकडे चौकशी केली असता राजू सुपनर (रा. अंमळनेर, ता. नेवासा) याची असल्याचे त्यांनी सांगितले.
नक्की पहा : गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime)
पोलिस हवालदार सोमनाथ आस्मानराव झांबरे यांच्या फिर्यादीवरून किरण बाबासाहेब सिसोदे (वय २५, रा. खलाल पिंप्री, ता. नेवासा), विवेक दत्तात्रय शिंदे (वय १९, रा. निपाणी निमगाव ता. नेवासा), आकाश तांबे (रा. पानेगाव), बाळासाहेब पुंडलिक नळगे (वय ४२, रा. बहिरवाडी) व राजू सुपनर (रा. अंमळनेर ता. नेवासा) याच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



