Crop Insurance | अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ११८ कोटीचा पीकविमा मंजूर

0

Crop Insurance | नगर : गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री पीकविमा (Crop Insurance) योजनेतून ११८ कोटी ६३ लाख ६४ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. उडीद, मूग, भुईमूग, कांदा, बाजरी, तूर आणि सोयाबीन या सात पिकांसाठी ही भरपाई मंजूर करण्यात आली आहे. मात्र श्रीगोंदा आणि संगमनेर तालुक्यांना या योजनेतून कोणतीही भरपाई मिळालेली नाही.

अवश्य वाचा-  खरीप हंगामासाठी सर्वंकष नियोजन करावे : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शेतपिकांचे नुकसान

कृषी विभाग महाराष्ट्र मार्फत राबविण्यात येणारी प्रधानमंत्री पीकविमा योजना नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी लागू करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी ही योजना एक रुपयांत उपलब्ध होती. मात्र नंतर शेतकऱ्यांना हप्ता भरावा लागू लागल्याने सहभागात घट झाल्याचे दिसून आले. खरीप २०२५ हंगामात जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार १७० शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला होता. त्यामध्ये २ लाख २३ हजार ७८८ हेक्टर क्षेत्राचा पीकविमा उतरविण्यात आला होता.

नक्की वाचा- जन्म-मृत्यूचे दाखले ते नळ कनेक्शन मिळणार एका क्लिकवर!

भरपाई मंजूर

मंजूर भरपाईमध्ये सोयाबीन पिकाचा सर्वाधिक वाटा असून, या पिकासाठी १०९ कोटी ७३ लाख २१ हजार रुपये मंजूर झाले आहेत. त्या खालोखाल उडीदासाठी ६ कोटी १९ लाख ९३ हजार, मुगासाठी १ कोटी ५८ लाख १६ हजार, तुरीसाठी ५१ लाख ४३ हजार, कांद्यासाठी २८ लाख १० हजार, भुईमुगासाठी २० लाख १६ हजार आणि बाजरीसाठी १२ लाख १४ हजार रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे.

पीकविमा मंजुरीच्या यादीत श्रीगोंदा आणि संगमनेर तालुक्यांचा समावेश नसल्याने त्या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. कर्जत तालुक्यासाठीही अत्यल्प, म्हणजे केवळ ८९ हजार रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

तालुकानिहाय मंजूर रक्कम (रुपयांत)

अहिल्यानगर – ५ कोटी ३ लाख ९६ हजार

अकोले – ११ कोटी १७ लाख ४ हजार

जामखेड – १७ कोटी ७१ लाख ६२ हजार

कर्जत – ८९ हजार

कोपरगाव – ९ कोटी ६६ लाख ३३ हजार

नेवासा – २२ कोटी ६८ लाख ८१ हजार

पारनेर – २१ कोटी ७२ लाख ६४ हजार

पाथर्डी – १ कोटी ४० लाख २ हजार

राहाता – १३ कोटी ९२ लाख ७१ हजार

राहुरी – ६ कोटी २४ लाख ९५ हजार

शेवगाव – १ कोटी ७ लाख ९१ हजार

श्रीरामपूर – १७ कोटी ९६ लाख ७५ हजार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here