
Deadly Attack : पाथर्डी : तालुक्यातील सोमठाणे नलवडे येथे वाहनाला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून संतप्त झालेल्या टोळक्याने एका कुटुंबाच्या घरावर तलवार, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांसह जीवघेणा हल्ला (Deadly Attack) चढविल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. २) सायंकाळी घडली. या हल्ल्यात महिलांसह १२ जण जखमी (Injured) झाले असून घरासमोर उभ्या असलेल्या तीन दुचाकींचीही (Two-wheelers) तोडफोड करण्यात आली.
नक्की वाचा : मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा; शिवसेना शिंदे गट आक्रमक
सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
या घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.याप्रकरणी शनिल रामदास काकडे (वय २०, रा. सोमठाणे नलवडे, ता. पाथर्डी) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संतोष माणिक खवले, राहुल विनायक खवले, माणिक खवले, अमोल खवले, चिमाजी धनवडे व अन्य सहा ते सात अनोळखी जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
काकडे यांना मारहाण (Deadly Attack)
शनिल काकडे व त्यांचा मित्र करण कासुळे हे शेतातून दुचाकीवरून घरी येत असताना जिल्हा परिषद शाळेजवळ संतोष खवले याने चारचाकी आडवी घालून गाडीला कट मारल्याचा जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद होऊन संतोष खवले याने शनिल काकडे यांना मारहाण केली. त्यावेळी करण कासुळे यांनी मध्यस्थी करून वाद मिटविला.मात्र, त्यानंतर अवघ्या काही वेळात संतोष खवले याने तलवार, राहुल खवले याने लोखंडी रॉड, अमोल खवले याने लोखंडी सळई तसेच इतरांनी लाकडी दांडके घेऊन मोठा जमाव काकडे यांच्या घरासमोर आणला. शनिल कुठे आहे, आज जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत आरोपींनी घरात घुसून बेछूट मारहाण सुरू केली.
तीन दुचाकींची तोडफोड
या हल्ल्यात महादेव झिरपे यांच्यावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी हात आडवा केल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. पार्वती काकडे, संगीता काकडे व सदाशिव ऊर्कीडे यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. तसेच नंदाबाई काकडे, तनेश काकडे, योगेश काकडे, दिपाली काकडे, रामा काकडे व शनिल काकडे यांनाही लाकडी दांडके, लोखंडी रॉड तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.हल्लेखोरांनी घरासमोरील तीन दुचाकींचीही लोखंडी रॉड व काठ्यांनी तोडफोड करून मोठे नुकसान केले.
या घटनेनंतर परिसरात मोठी दहशत निर्माण
दरम्यान, घटनास्थळी येत असलेल्या ज्ञानेश्वर आप्पासाहेब नलवडे यांनाही आरोपींनी अडवून लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण केली.घटनेनंतर माऊली बडे, गणेश कासुळे, शुभम चव्हाण, महेश चव्हाण, संदीप चव्हाण व अशोक कासुळे यांनी जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, पाथर्डी येथे दाखल केले. गंभीर जखमी झालेल्या माऊली नलवडे यांना पुढील उपचारासाठी शेवगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेनंतर परिसरात मोठी दहशत निर्माण झाली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जखमींना उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या वाहनांनाही आरोपींकडून अडविण्याचा दमदाटी व करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
वाहने पेटवून देण्याची धमकी
मदत करणाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली असून वाहने पेटवून देऊ अशा धमक्याही देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.या हल्ल्यात वृद्ध महिलांनाही लक्ष्य करण्यात आल्याने गावात तीव्र संताप व्यक्त होत आहे. गाडीला कट लागल्याचे कारण पुढे केले जात असले तरी या घटनेमागे गावातील स्थानिक राजकारणाची पार्श्वभूमी आहे का, अशी चर्चा गावात सुरू झाली असून त्या अनुषंगानेही पोलीस तपास करत आहेत. पाथर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी संबंधित आरोपींसह अन्य अनोळखी सहा ते सात जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर हे या गुन्ह्याचा तपास करत आहे.


