Death : पारनेर : तालुक्यातील भांडगाव येथील खरमाळे वस्तीवर मध्यरात्री एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी (Thieves) केलेल्या जबर मारहाणीत संदीप भास्कर खरमाळे (वय ५२) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला. हा प्रकार शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला असून, या घटनेमुळे संपूर्ण पारनेर तालुक्यात (Parner Taluka) खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा : श्रीगोंद्यात पाहायला मिळालं अनोखं प्राणिप्रेम; काष्टीच्या बाजारातून घरी परततानाचा भावूक प्रसंग
साहित्याची मोठ्या प्रमाणावर उचकापाचक
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत संदीप खरमाळे यांचे कुटुंबीय काही कामानिमित्त अहिल्यानगर येथे गेले होते. त्यामुळे खरमाळे हे घरी एकटेच होते. रात्री ते आपल्या राहत्या घराजवळील पत्राच्या शेडमध्ये झोपले होते. गुरुवारी (ता. १४) मध्यरात्री ते शुक्रवारी (ता. १५) पहाटेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने वस्तीवर दरोडा टाकला. यावेळी चोरट्यांनी खरमाळे यांच्या घराचे कुलूप तोडून आतील कपाटासह इतर साहित्याची मोठ्या प्रमाणावर उचकापाचक केली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
खरमाळे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जबर वार (Death)
या दरम्यान चोरट्यांनी खरमाळे यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जबर वार केले. हा वार इतका भीषण होता की, त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. १५) दिवसभर संदीप खरमाळे हे फोन उचलत नसल्याने त्यांच्या मुलाला संशय आला. मुलाने तत्काळ गावातील नातेवाईकांशी संपर्क साधून घरी जाऊन पाहण्यास सांगितले. नातेवाईकांनी सायंकाळी ५ वाजता भांडगाव येथील वस्तीवरील घरी जाऊन खात्री केली असता, संदीप खरमाळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. हा धक्कादायक प्रकार पाहताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
चोरट्यांचा माग काढण्यासाठी पथके रवाना
घटनेची माहिती मिळताच पारनेर पोलीस प्रशासन तत्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. घटनास्थळी उप विभागीय पोलीस अधिकारी शिरीष ओमने ,स्थानिक गुन्हे शाखेचे किरणकुमार कबाडी ,पोलीस निरीक्षक संतोष खेडकरयांच्यासह डॉग स्क्वॉड, ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक पथकाने भेट देऊन कसून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे.या घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.



