नगर : छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) पराक्रमाची आणि बलिदानाची साक्ष देणारी वस्तू म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील धर्मवीरगड (Dharmveer Gad). जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील ‘धर्मवीर गड’ (पेडगाव) बाबत राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने ७ सप्टेंबर रोजी शासन निर्णय (GR) जारी करत या गडाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ (State Protected Monument) म्हणून घोषित केले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ऐतिहासिक वारसा असलेल्या धर्मवीर गडाचे जतन, संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.
नक्की वाचा : अहिल्यानगरच्या ५७५ तरुणांना अनाथ प्रमाणपत्र; यशाचे दार उघडले!
आमदार विक्रम पाचपुते यांच्या पाठपुराव्याला यश (Dharmveer Gad)

भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी धर्मवीर गडाच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याआधी पाचपुते यांच्याच मागणीनुसार पेडगाव येथील या ऐतिहासिक ‘बहादूरगडाचे’ नामकरण ‘धर्मवीर गड’ असे अधिकृतपणे करण्यात आले होते. त्यानंतर आता हा गड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाल्यामुळे पाचपुते यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
अवश्य वाचा : मंत्रालयात शिक्षणमंत्र्यांच्या अधिकाराला कात्री; मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया आली समोर
धर्मवीरगडावर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती (Dharmveer Gad)
इतिहासानुसार, संगमेश्वर येथे मुघलांनी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना पकडल्यानंतर त्याच गडावर आणले होते. गडावर संभाजी महाराजांचे मुघलांकडून अतोनात हाल करण्यात आले होते. याशिवाय, या गडावर यादवकालीन उत्कृष्ट स्थापत्यकलेचा नमुना असलेली रामेश्वर मंदिर, भैरवनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, बाळेश्वर मंदिर आणि पाताळेश्वर मंदिर ही प्राचीन मंदिरे आहेत.
महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तू शास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६० अंतर्गत सांस्कृतिक कार्य विभागाने ही दोन महिन्यांची प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एकूण ३,७७,३०० चौरस मीटर क्षेत्र संरक्षित केले जाणार असून, यामध्ये रामेश्वर मंदिर, भैरवनाथ मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, वाडे आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा समावेश आहे. आमदार विक्रम पाचपुते यांनी या गडावर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणीही लावून धरली आहे.



