Dhiraj Pardeshi death : धीरज परदेशी मृत्यूप्रकरणी अहिल्यानगर बंदची हाक; अंत्यविधीवरून आमदार संग्राम जगताप आक्रमक

0
Dhiraj Pardeshi death : धीरज परदेशी मृत्यूप्रकरणी अहिल्यानगर बंदची हाक; अंत्यविधीवरून आमदार संग्राम जगताप आक्रमक
Dhiraj Pardeshi death : धीरज परदेशी मृत्यूप्रकरणी अहिल्यानगर बंदची हाक; अंत्यविधीवरून आमदार संग्राम जगताप आक्रमक

Dhiraj Pardeshi death : नगर : अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात महापालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने अहिल्यानगर शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज (ता. १०) अहिल्यानगर बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान धीरज परदेशी यांच्या मृतदेहाचे  शवविच्छेदन घाटी रुग्णालयात होणार आहे. मात्र, मुख्य आरोपीला अटक झाल्याशिवाय अंत्यविधी होऊ देणार नसल्याची भूमिका आमदार संग्राम जगताप यांनी घेतल्याने आता प्रशासन आणि पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा : धीरज परदेशी यांचा प्राणघातक हल्ल्यात मृत्यू; महापालिका कर्मचारी युनियनचा बेमुदत संपाचा इशारा

पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली असून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करत हैदराबादपर्यंत धाव घेत संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, या कारवाईनंतरही मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने संताप कायम आहे. मुख्य आरोपीला अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका आंदोलकांकडून घेण्यात आली आहे. 

नक्की पहा : धीरजचा मृतदेह पोलीस अधीक्षक कार्यालयात ठेवणार; आमदार संग्राम जगतापांनी दिला इशारा

अहिल्यानगर बंदची हाक (Dhiraj Pardeshi death)

या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी अहिल्यानगर शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धीरज परदेशी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, हल्ल्यातील मुख्य आरोपीला तातडीने अटक करावी आणि या घटनेमागील संपूर्ण कटाचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागण्यांसाठी बंद पुकारण्यात आला आहे. महापालिका कर्मचाऱ्यावर कर्तव्य बजावत असताना झालेल्या हल्ल्यामुळे कर्मचारी वर्गातही असंतोष आहे. त्यामुळे बंदला शहरातील विविध घटकांचा कितपत प्रतिसाद मिळतो, तसेच पोलिसांकडून मुख्य आरोपीच्या अटकेसाठी कोणती कारवाई केली जाते, याकडे आता अहिल्यानगरचे लक्ष लागले आहे.