District Bank Election : पारनेर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) निवडणुकीसाठी पारनेर सोसायटी मतदारसंघात सोमवारी (ता. २) शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावर एकूण १०४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) आणि भाजपचे राहुल शिंदे पाटील (Rahul Shinde Patil) यांच्यात थेट लढत होत असल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
नक्की वाचा : टाकळी ढोकेश्वरमध्ये घरफोडी करणारी जालना जिल्ह्यातील टोळी जेरबंद; तीन जण ताब्यात
निवडणूक लढविण्यासाठी अनेक दिग्गज इच्छुक
जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून पारनेर तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. सोसायट्यांचे ठराव आपल्या बाजूने वळविण्यासाठी विविध राजकीय गटांकडून प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सुरुवातीपासूनच पारनेर सोसायटी मतदारसंघाची निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती.या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक दिग्गज इच्छुक होते. त्यामुळे सुरुवातीला तिरंगी किंवा चौरंगी लढतीची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम टप्प्यात अनेक इच्छुकांनी माघार घेतल्याने अखेर खासदार निलेश लंके विरुद्ध भाजपचे राहुल शिंदे पाटील अशी थेट लढत निश्चित झाली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
प्रत्येक मताचे महत्त्व वाढले (District Bank Election)
मतदारसंघात एकूण १०४ मतदार असल्याने प्रत्येक मताचे महत्त्व वाढले आहे. दोन्ही बाजूंकडून आपल्याकडे ६० ते ६५ टक्के मतदारांचा पाठिंबा असल्याचे दावे करण्यात आले होते. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानातून कोणाच्या पारड्यात किती मते पडली, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील अनेक मतदारसंघांत बिनविरोध निवडी झाल्या असताना पारनेरमध्ये मात्र उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. मंगळवारी (ता. ३) मतमोजणी होणार असून, या प्रतिष्ठेच्या लढतीत बाजी कोण मारणार, याकडे आता पारनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मतदान प्रक्रिया सकाळी आठ वाजल्यापासून अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार पडली. सोसायटी मतदार संघासह सर्वच मतदार संघात कुठलाही गैरप्रकार न घडता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. हि समाधानाची बाब आहे. या निवडणुकीत मतदारांचा कौल आणि मतदानाचे गणित पाहता राहुल शिंदे पाटील यांचे विजया बाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ते या निवडणुकीत शंभर टक्के विजयी होतील असा ठाम विश्वास आहे. सहकार क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकरी बांधवांच्या हितासाठी हि निवडणूक महत्वाची आहे. सर्वांनी शांततेत मतदान पार पाडण्यासाठी दिलेले सहकार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.
आमदार काशिनाथ दाते



