
Ahilyanagar Drug Case: अहिल्यानगर : शहरातील अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीमागील संपूर्ण जाळे उघड करण्याच्या उद्देशाने तोफखाना पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईला आठवडा उलटला आहे. सुमारे 30 लाख किमतीचे ड्रग्स जप्त करून मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी या ड्रग्सचा मूळ पुरवठादार आणि त्यामागील प्रमुख सूत्रधार अद्यापही हाती लागलेला नाही. त्यामुळे शहरात ड्रग्सचा पुरवठा नेमका कोण करत आहे, हा प्रश्न कायम आहे.
150 ग्रॅम ड्रग्स जप्त करण्यात आले (Drug Case)
प्राथमिक तपासानुसार, पुणे, मुंबई आणि राजस्थानमधून अमली पदार्थ अहिल्यानगरमध्ये आणले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गेल्या आठवड्यात शहरात सलग दोन कारवाया करत लाखो रुपयांचे ड्रग्स जप्त केले. त्यातील सर्वात मोठ्या कारवाईत एका चारचाकी वाहनातून तब्बल 150 ग्रॅम ड्रग्स जप्त करण्यात आले. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, ते सर्व मुकुंदनगर परिसरातील रहिवासी आहेत.
ड्रग्स नेटवर्क पोलिसांच्या रडारबाहेर (Drug Case)
अटकेतील आरोपींच्या चौकशीत जमीर शेख यानेच ड्रग्स उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली होती. घटनेनंतर फरार झालेल्या जमीरला पोलिसांनी नंतर मुकुंदनगर परिसरातून अटक केली. त्यानंतर ड्रग्स पुरवठ्याची पुढील साखळी उघड होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्याच्या अटकेनंतरही ड्रग्सचा मूळ स्रोत आणि त्यामागील नेटवर्क अद्याप स्पष्ट झालेले नाही.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
या कारवाईदरम्यान पोलिसांनी ड्रग्सव्यतिरिक्त चारचाकीतून प्लास्टिकचे मुखवटे, लाईटरगन, सुताची दोरी आणि चाकू जप्त केले. या साहित्याच्या आधारे आरोपींवर दरोड्याचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र, हे साहित्य नेमक्या कोणत्या उद्देशाने वापरण्यात येणार होते, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या वस्तूंचा आणि ड्रग्स व्यवहाराचा काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे.
ड्रग्स नेटवर्क उघड होण्याची अपेक्षा (Drug Case)
दरम्यान, न्यायालयाने जमीर शेख याला 29 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान त्याने ड्रग्स कुठून आणले, कोणाच्या संपर्कातून व्यवहार केला आणि शहरातील वितरण साखळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तपासातून उर्वरित आरोपी आणि संपूर्ण ड्रग्स नेटवर्क उघड होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नक्की वाचा: अन्यायाविरुद्ध उभा ठाकणार ‘रंगा’! ‘सायको रंगा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित ..!!!


