नगर : वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरे,पक्षी ही सुस्वरें आळविती,असं संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगात म्हंटल आहे. या अभंगात निसर्गाप्रती (Environmental Degradation) असलेली आदरभावना आणि प्रेम त्यांनी सुंदर शब्दांत मांडलं आहे. मात्र सध्या कोणताही सण उत्सव आला की, विद्युत रोषणाई केली जाते. यासाठी परिसरातील झाडांचा वापर होतो. झाडांवर विद्युत माळा सोडल्या जातात. त्यासाठी झाडांवर खिळे ठोकले (Driving nails into trees) जातात. सण संपले तरीही दीर्घकाळ ही रोषणाई राहते. तर बऱ्याच वृक्षांना ठोकलेले खिळे काढलेच जात नाही. वर्षानुवर्षे ते तसेच राहून जातात. याशिवाय इतरही कारणांसाठी झाडांवर खिळे ठोकले जातात. आपण आपल्या आनंदासाठी, सोयीसाठी झाडांना नकळत दुःख देतो. मात्र हा मोठा गुन्हा आहे. त्यासाठी नियम आहेत, दंडाची तरतुदही (Penalty provision) आहे. मात्र तरीही याकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही. मात्र असं घडल्यास कायद्यात काय तरतुदी आहेत हेच आज पाहूया…
नक्की वाचा : वेतन कपातीच्या मनमानीला लागणार चाप; राज्यभरात नवे नियम लागू, कर्मचाऱ्यांना होणार फायदा
प्रमुख कायदे आणि नियम काय आहेत? (Environmental Degradation)
‘महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५’ नुसार झाडांना खिळे ठोकणे, फांद्या छाटणे किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे इजा पोहोचवणे हा गंभीर आणि दखलपात्र गुन्हा आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास प्रत्येक झाडामागे १,००० ते ५,००० रुपयांपर्यंत दंड आकारला जातो आणि वारंवार गुन्हा केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो.
* महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ – या कायद्याच्या कलम २१ नुसार शहरी भागातील झाडांना इजा पोहोचवणे, खिळे ठोकणे किंवा झाडे वाळतील असे कृत्य करणे बेकायदेशीर आहे.
* महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा, १९९५ – नुसार, सार्वजनिक ठिकाणच्या झाडांवर परवानगीशिवाय जाहिराती, पोस्टर्स किंवा बॅनर्स खिळे ठोकून लावण्यास या कायद्याने सक्त मनाई आहे.* स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियम – महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात वृक्ष प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय झाडांवर केबल्स टांगणे किंवा दिव्यांच्या माळा खिळ्यांनी अडकवणे हा दंडनीय अपराध मानला जातो.
झाडांचे नुकसान करणाऱ्यांना मात्र दंडालाही सामोरे जावे लागणार आहे. जर तुम्ही प्रथम नियम मोडला तर तर तुम्हाला एक हजार रुपये, दुसऱ्या वेळी तीन हजार रुपये, तर तिसऱ्या वेळी पाच हजार रुपये दंड आकारण्यास वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे. आणि जर तुम्ही वारंवार असं कृत्य केलं, तर प्रभाग अधिकाऱ्यां मार्फत तुमच्यावर थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो.
इतर कायदेशीर परिणाम (Environmental Degradation)
१. झाड वाळल्यास मोठा दंड – खिळे ठोकल्यामुळे किंवा रासायनिक प्रक्रियेमुळे झाड सुकले किंवा नष्ट झाले, तर ती ‘अवैध वृक्षतोड’ मानली जाते. अशा स्थितीत झाडाच्या मूल्यांकनानुसार २५,००० ते १ लाख रुपयांपर्यंत दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा तुम्हाला होऊ शकते.
२. साहित्य जप्ती – जर तुम्ही झाडांवर बॅनर्स, बोर्ड किंवा इतर पाट्या लावल्या तर हे लावलेले बॅनर्स, बोर्ड आणि केबल्स महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जप्त केले जातात.
झाडांच्या खोडावर खिळे ठोकून त्यावर कोचिंग क्लासेस, डॉक्टर, इव्हेंट मॅनेजमेंट आणि राजकीय शुभेच्छांच्या पाट्या लावल्या जातात. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा अनेक ठिकाणी असे प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र स्वतःच्या व्यवसायाची प्रसिद्धी करण्यासाठी निसर्गाची हानी करताना नागरिक संवेदना हरवून बसले आहेत. झाडांना केवळ लाकूड समजून त्यावर होणारे आघात वृक्षांचे आयुष्य वेगाने कमी करत आहेत.
हॉटेलिंग आणि विवाह सोहळ्यांसाठी झाडांना ‘एलईडी’ माळांनी घट्ट गुंडाळले जाते. हे केवळ विद्रुपीकरण नसून झाडासाठी एक प्रकारचा ‘शॉक’ आहे. सततच्या लायटिंगमुळे निर्माण होणारी उष्णता झाडांच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम करते. झाडावर वास्तव्याला असणारे पक्षी आणि कीटक या कृत्रिम प्रकाशामुळे आपला अधिवास सोडून पळत आहेत. पक्ष्यांच्या प्रजनन चक्रावरही याचे घातक परिणाम होत आहेत.



