Farmer Electricity : शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासह पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार : राधाकृष्ण विखे पाटील

0
Farmer Electricity : शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासह पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार : राधाकृष्ण विखे पाटील
Farmer Electricity : शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासह पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणार : राधाकृष्ण विखे पाटील

Farmer Electricity : नगर : शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्या निर्णयाची अंमलबजावणी सौर ऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून सुरू झाली आहे. यासोबतच दमणगंगा-वैतरणा-गोदावरी प्रकल्पाचे पाणी थेट तळेगाव परिसरापर्यंत आणून या भागातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यावर शासनाचा भर आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासह स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

हेही वाचा : ८८५ कोटी रुपयांच्या अंतिम आराखड्यास मंजुरी; जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक

सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे महावितरणच्या पाच मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा तसेच पारेगाव खुर्द येथील पाच मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार अमोल खताळ, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार, स्थानिक पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, सरपंच आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील म्हणाले, सध्या पाणीस्थिती अत्यंत गंभीर आहे. प्रशासनाच्या वतीने पाण्याचे नियोजनबद्ध वितरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तळेगावपर्यंत पाणी आणण्यासाठी वैजापूर चारीच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून त्यासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे तळेगाव परिसरातील शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे.

नक्की पहा : अभिनेते सचिन खेडेकर साई चरणी

दुष्काळी भागाला दिलासा (Farmer Electricity)

सिन्नर तालुक्यासाठी तयार करण्यात आलेल्या १२ हजार कोटी रुपयांच्या दमणगंगा-वैतरणा-गोदावरी प्रकल्पात आता संगमनेर तालुक्यातील भागाचाही समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पाणी तळेगाव परिसरातील खालच्या पट्ट्यापर्यंत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद दिला असून यामुळे या दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळणार असल्याचे डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.