
FDA : नगर : राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थांमध्ये होणाऱ्या ‘ॲनालॉग चीज’ आणि आईस्क्रीममधील भेसळीच्या विरोधात भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. या गंभीर प्रश्नावर आमदार पाचपुते यांनी मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन (FDA) मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले. राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या घटकांवर तातडीने आणि कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा : दरेकर कुटुंबाला ४ लाखांची मदत; आमदार पाचपुतेंचा पाठपुरावा
निवेदनातील मागण्या
आमदार विक्रम पाचपुते यांनी यापूर्वी प्रशासकीय पातळीवर एफडीएचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांच्याकडेही याविषयी दाद मागितली होती. आता त्यांनी थेट मंत्र्यांकडे धाव घेत या विषयाचा राजकीय व धोरणात्मक पाठपुरावा अधिक तीव्र केला आहे. हा विषय थेट लहान मुले आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी निगडित आहे. कृत्रिम फॅट्स आणि पाम ऑईलचा अतिवापर शरीरासाठी घातक असल्याने यावर कठोर प्रतिबंध आवश्यक आहेत. शुद्ध दुधाच्या नावाखाली ग्राहकांना बनावट पनीर, ॲनालॉग चीज किंवा आईस्क्रीमऐवजी ‘फ्रोजन डेझर्ट’ देऊन फसवणाऱ्या घटकांवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कडक गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नक्की पहा : नसरापूर अत्याचार प्रकरणात आज कोर्टात काय घडलं? आरोपीला फाशी की जन्मठेप?
झिरवाळांचा सकारात्मक प्रतिसाद (FDA)
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेतली. नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे सांगत या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत सखोल चौकशी करून योग्य ती कठोर कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही आमदार पाचपुते यांना दिली. आमदार पाचपुते यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता राज्य सरकार ॲनालॉग चीज आणि आईस्क्रीममधील भेसळीबाबत संपूर्ण राज्यासाठी काही मोठा धोरणात्मक निर्णय किंवा कडक नियमावली जाहीर करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


