Government assistance : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथील तरुण शेतकरी अभिषेक रूपचंद दरेकर (वय २२) यांचा शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. आमदार विक्रम पाचपुते यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही मदत मंजूर होऊन संबंधित रक्कम लाभार्थीच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे.
नक्की वाचा : फेसबुकवर ट्रॅक्टर भाड्याने घेण्याचे आमिष दाखविणारा जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
विधिमंडळाच्या अधिवेशनात मागणी
घोडेगावचे माजी सरपंच रूपचंद दरेकर यांचे एकुलते एक पुत्र असलेल्या अभिषेक यांचा काही दिवसांपूर्वी शेतात ट्रॅक्टर चालवत असताना वीज कोसळून जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. दरेकर कुटुंबावर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगाची दखल घेत आमदार विक्रम पाचपुते यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात हा विषय मांडून शासनाकडे तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाने दरेकर कुटुंबासाठी ४ लाख रुपयांची मदत मंजूर केली.
नक्की पहा : जिल्ह्यातील चार लाख बालकांना दिली जाणार पोलिओची लस : जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे
प्रशासनाकडून दरेकर कुटुंबाला माहिती (Government assistance)
याबाबतची माहिती देण्यासाठी तहसीलदार सचिन डोंगरे, नायब तहसीलदार व तलाठी यांनी दरेकर कुटुंबाची भेट घेतली. अभिषेक यांच्या अकाली निधनामुळे आई-वडील आणि अविवाहित बहिणीचा आधार हरपला आहे. शासनाकडून मिळालेली आर्थिक मदत ही दुः खाची भरपाई नसली तरी संकटाच्या काळात दिलासा देणारी ठरत असल्याचे मत व्यक्त होत आहे. वीजेच्या एका तडाख्याने दरेकर कुटुंबाचा आधार हिरावला; मात्र आमदार विक्रम पाचपुते यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाची मदत वेळेत मिळाली, अशी भावना घोडेगाव परिसरात व्यक्त होत आहे.



