
Food and Drug Administration : राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध कडक मोहीम (Strict campaign against adulterators) सुरू आहे. त्यांच्या या धडक कार्यवाहीची सर्वत्र वाहवाह होत असतानाच, शिर्डीमध्ये (Shirdi) मात्र साईभक्तांना अतिसाखरेचा आणि निकृष्ट दर्जाचा पेढा विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यानंतर अहिल्यानगरचे अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) जागे झाले असून भेसळ पुरवठा अधिकारी यांनी तातडीने काही दुकानांमधील पेढ्यांचे सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते.
या पार्श्वभूमीवर , शिर्डी शहरात अन्न व औषध प्रशासन, दुग्ध विकास विभाग आणि वजन-मापे निरीक्षक विभागाच्या संयुक्त पथकाने अचानक धाडसत्र राबवले. या धडक कारवाईत विविध पेढे उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी आणि प्रसाद म्हणून पेढे विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे टाकण्यात आले.
निकृष्ट दर्जाचे पेढे आढळून आले
या संयुक्त कारवाईदरम्यान पथकाला मोठ्या प्रमाणावर संशयास्पद आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे पेढे आढळून आले. प्रशासनाने तत्परता दाखवत सुमारे ६०० किलो पेढे जप्त केले. या पेढ्यांचे नमुने (सॅम्पल्स) पुढील कायदेशीर तपासणीसाठी सीलबंद करण्यात आले असून, उर्वरित सर्व निकृष्ट पेढे शिर्डी नगरपालिकेच्या डंपिंग ग्राऊंडवर नेऊन जेसीबीच्या साहाय्याने नष्ट करण्यात आले आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अन्न सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन (Food and Drug Administration)
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक शिर्डीत दाखल होत असतात. भाविकांची ही वाढती संख्या लक्षात घेऊन काही नफेखोर मिठाई उत्पादक अन्न सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेत पथकाने शिर्डीतील नामांकित पेढे उत्पादक मते, गोंदकर आणि जाधव यांच्या कारखान्यांची कसून तपासणी केली. या तपासणी दरम्यान कारखान्यांमध्ये प्रचंड अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे पालन केले जात नसल्याचे उघडकीस आले.
या मोहिमेत केवळ पेढ्यांच्या दर्जाचीच नव्हे, तर वजनाचीही तपासणी करण्यात आली. वजन-मापे निरीक्षक पथकाने केलेल्या कारवाईत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.अनेक दुकानांमधील वजन काट्यांची अधिकृत नोंदणी (स्टॅम्पिंग) केलेली नव्हती.ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पेढ्यांच्या वजनात मोठी तफावत आढळून आली, ज्यामुळे भक्तांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले.
शिर्डीत झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे शहरात मिठाई आणि पेढे विकणाऱ्या भेसळखोरांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, भाविकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. आगामी काळातही अशाच प्रकारच्या धडक कारवाया सुरू राहणार असा सज्जड इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.


