
Fraud : नगर : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची तब्बल १४ लाख २० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना नगरमध्ये उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे त्या तरुणाने आरोपींकडे जास्त तगादा लावल्यावर त्याला चक्क स्टेट बँक (State Bank of India) तसेच एका आश्रम शाळेचे बनावट नियुक्ती पत्रे देण्यात आली होती. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) ६ जणांच्या विरुद्ध फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद
याबाबत बोल्हेगाव येथील विठ्ठल रेवन्नाथ पाटेकर (वय ३२) या तरुणाने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी मंगेश मार्शल भिंगारदिवे, उषा मंगेश भिंगारदिवे (दोघे रा. भिस्तबाग चौक), नितीन बाळासाहेब जाधव (रा. अहिल्यानगर), कालिदास बेळगे (रा. पाथर्डी), दिवाकर साही (रा. पिंपळे गुरव, पुणे) आणि बाळासाहेब केदार (रा. मतीमंद मुलांच्या निवासी शाळेजवळ, तपोवन रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
खोटे नियुक्ती पत्र देऊन फसवणूक (Fraud)
फिर्यादी विठ्ठल पाटेकर यांची ओळख टायपिंग क्लासला जात असताना मंगेश भिंगारदिवे याच्याशी झाली होती. मंगेशने आरोग्य विभागात लॅब टेक्निशियनची नोकरी लावून देतो असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून वेगवेगळ्या टप्प्यांवर पाटेकर यांच्याकडून ३ लाख ८० हजार ऑनलाईन आणि १० लाख ४० हजार रोख असे एकूण १४ लाख २० हजार रुपये घेतले. नोकरीचे काम न झाल्याने पाटेकर यांनी पैशांची मागणी केली असता, आरोपींनी त्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया आणि नंतर एका निवासी शाळेचे खोटे नियुक्ती आदेश (ऑर्डर) देऊन त्यांची फसवणूक केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटेकर यांनी पैशांसाठी तगादा लावला. त्यावर आरोपींनी त्यांना वारंवार धमकावले आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. त्यानंतर पाटेकर यांनी १० जून रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण पुढील तपास करत आहेत.


