
Gram Panchayat : नगर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान (Chief Minister’s Samruddha Panchayat Raj Abhiyan) २०२५-२६ अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी (Gram Panchayat) विभागस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या अभियानात जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींनी पुरस्कार (Awards) पटकावत जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाच्या कामगिरीची छाप उमटविली आहे. विभागस्तरीय स्पर्धेत पारनेर तालुक्यातील रेनवडी ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांकासह ८० लाख रुपये, तर राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांकासह ६० लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. याशिवाय जिल्हास्तरीय स्पर्धेत कासारपिंपळगाव ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळवत ५० लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. सौंदाळा ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांकासह ३० लाख रुपये, तर हिवरे बाजार ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवत २० लाख रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. ग्रामविकास विभागाने ६ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करून विभागस्तरीय पुरस्कारांची घोषणा केली.
नक्की वाचा : दुष्काळग्रस्त ८७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना ४,३७२ कोटींची दिवाळी अग्रीम मदत
पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान
त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींनी आपल्या विकासकामांच्या जोरावर विभागस्तरावर यश मिळवले आहे. पाथर्डी तालुक्यातील कासारपिंपळगाव, नेवासा तालुक्यातील सौंदाळा आणि अहिल्यानगर तालुक्यातील हिवरे बाजार या ग्रामपंचायतींनी पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवले. त्याचबरोबर पारनेर तालुक्यातील रेनवडी आणि राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक या ग्रामपंचायतींनीही पुरस्कार मिळवत जिल्ह्याच्या यशात भर घातली आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान १७ सप्टेंबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात आले होते. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवणे, गावांमध्ये मूलभूत सुविधांचा विकास करणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामपंचायतींमध्ये निकोप स्पर्धा निर्माण करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब (Gram Panchayat)
या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींचे प्रथम तालुकास्तरावर, त्यानंतर जिल्हा आणि विभागस्तरावर मूल्यमापन करण्यात आले. विविध निकषांच्या आधारे समित्यांनी केलेल्या तपासणी व गुणांकनातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली. एकाच जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींनी विभागस्तरावर पुरस्कार मिळवणे ही अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. या यशामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या विकासकामांना प्रोत्साहन मिळणार असून, जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींनाही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणा मिळणार आहे.


