Heritage: नगर: “महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राज्यभरातील शाखांपैकी सावेडी ही एकमेव शाखा आहे, जी दरवर्षी अत्यंत दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करते. यामुळेच ‘वारसा’ (Heritage) अल्पावधित राज्यातील साहित्य रसिकांच्या पसंतीस उतरला आहे. नगर जिल्ह्याच्या साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीमध्ये सावेडी शाखेचे योगदान मोलाचे असून, हे कार्य भविष्यातही असेच अखंडपणे चालू ठेवले जाईल,” असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (Maharashtra Sahitya Parishad) सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष तथा ‘वारसा’चे संपादक उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेची सावेडी उपनगर शाखा व शांतिकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या 11 व्या “वारसा” दिवाळी अंकाचे प्रकाशन फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक मेधा काळे होत्या. यावेळी मसापचे जिल्हा प्रमुख प्रा. गणेश भगत, सुरेश चव्हाण उपस्थित होते.
नक्की वाचा : प्रारुप विकास आराखड्यासंबंधी न्यायालयात बाजू मांड़णार, गंगा उद्यानजवळ अरुणकाकांचा पुतळा; मनपाचे निर्णय
उत्तम साहित्य निर्मितीची जबाबदारी आता आपल्यावर
फिरोदिया म्हणाले, ‘आजची तरुणाई सोशल मीडियासोबत पुन्हा प्रिंट मिडियाकडे आकर्षित होतेय, याचे समाधान आहे. त्यामुळे उत्तम साहित्य निर्मितीची आता आपल्यावर जबाबदारी आहे. अशा दिवाळी अंकांतून वाचनाचा खरा आनंद आपल्याला मिळतो.’ ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी शाखेने राज्यस्तरीय तीन साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले. यापुढेही साहित्य चळवळ समृद्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून जिल्ह्याचे नाव साहित्य नकाशावर अग्रगण्य असावे, असे काम सर्वांच्या सहकाऱ्याने करण्याचा प्रयत्न असणार आहे,’ असेही फिरोदिया म्हणाले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
दिवाळी अंकातून समाजाला वैचारिक समृद्धी
प्रा. मेधा काळे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी शाखेच्या माध्यमातून होणाऱ्या चौफेर साहित्यिक कार्याचा गौरव केला. त्या म्हणाल्या, “ऐतिहासिक नगर शहराच्या जडणघडणीत आणि सांस्कृतिक वारसा जपण्यात नरेंद्र फिरोदिया व जयंत येलुलकर यांच्या पुढाकारातून काढण्यात येणारा हा दिवाळी अंक समाजाला वैचारिक समृद्धी देतो.” दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक व मसापचे प्रमुख कार्यवाह जयंत येलुलकर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी ‘वारसा’ दिवाळी अंकाच्या निर्मितीमागची भूमिका आणि सावेडी शाखेच्या उपक्रमांचा आढावा घेतला. ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, प्रा. गणेश भगत, इतिहास संशोधक प्रा. नवनाथ वाव्हळ यांचीही भाषणे झाली. शाखेचे पदाधिकारी विजय पिंपरकर, स्नेहल उपाध्ये, सतीश डेरेकर यांच्यासह रेखाचित्रकार ज्योती डेरेकर, डॉ.चंद्रकांत जोशी, ल.धो. खराडे, ज्योतिषाचार्य संजय कुलकर्णी, जालिंदर बोरुडे, शब्बीर शेख, प्राची थिगळे, कवयित्री सरोज आल्हाट, उद्योजक राजन उत्तेकर, भानुदास महानूर, एम. पी. दिवाण, दिलीप शहापूरकर, सूर्यकांत थिगळे तसेच ‘वारसा’ अंकातील लेखक, कवी आणि नगरमधील रसिक वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजा पाठक यांनी तर आभार प्रदर्शन सुदर्शन कुलकर्णी यांनी केले.



