High Court : कर्जत : नगरपंचायतीच्या (Nagar Panchayat) सत्तासंघर्षावर बुधवारी (ता.१) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) उच्च न्यायालयाने (High Court) महत्वपूर्ण निकाल देत पूर्णविराम लावला असून सतीश पाटील हेच आता गटनेते पदावर कायम राहतील असा निर्वाळा दिला. तसेच कर्जत नगराध्यक्षा (Municipal Council President’s) पदाच्या अविश्वास ठरावावर रखडलेली बैठक १० दिवसांच्या आत घ्यावी, असे आदेश दिले. तत्कालीन गटनेते असणारे संतोष मेहेत्रे आणि नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या दोन्ही याचिका उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आल्या.
नक्की वाचा : जागेचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याने ठोकले शाळेला कुलूप; जांभूळवाडी येथील घटना
मनमानी कारभाराचा ठपका
मागील दोन महिन्यांपासून कर्जत नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांतील सत्तासंघर्ष अखेर निवळला. कर्जत नगरपंचायतीतील भाजपाच्या ९ आणि आमदार रोहित पवार यांच्या ४ अशा १३ नगरसेवकांनी तत्कालीन गटनेते संतोष मेहेत्रे यांच्यावर सर्व नगरसेवकांत अविश्वास निर्माण करीत मनमानी कारभाराचा ठपका ठेवत त्यांना बहुमताने पदावरून दूर करण्यात आले होते.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पदावरून दूर करण्याची मागणी (High Court)
त्यांच्या जागी उपगटनेते असणारे सतीश पाटील यांना जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे १३ नगरसेवकांनी सह्याचे पत्र देत नूतन गटनेते पदाची जबाबदारी ७ मे रोजी दिली. त्यानंतर त्याच दिवशी नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्यावर देखील १३ नगरसेवकांनी अविश्वास ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करीत त्यांना पदावरून दूर करण्याची मागणी केली. याबाबत जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी नगराध्यक्षा पदाच्या अविश्वास ठरावावर कर्जतचे प्रांताधिकारी नितीन पाटील यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करीत १३ मे ला विशेष सभा आयोजित केली होती.
दोन महिने न्यायालयीन लढाई
मात्र गटनेत्या बदलावर आणि नगराध्यक्षा पदाच्या अविश्वास ठराव मागणीवर संतोष मेहेत्रे आणि रोहिणी घुले यांनी न्यायालयाच्या दार ठोठावत दोन्ही निर्णयावर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) उच्च न्यायालयात दाद मागत स्थगिती मिळवण्यात यश मिळवले होते. त्यामुळे स्थानिक प्रशासनास १३ मे ची विशेष सभा रद्द करण्याची नामुष्की आली. गटनेता बदल आणि नगराध्यक्षा पदाच्या अविश्वास ठरावावर तब्बल दोन महिने न्यायालयीन लढाई झाली. या दोन महिन्यांच्या लढाईनंतर बुधवारी, (ता. १) उच्च न्यायालय औरंगाबाद येथे अंतिम सुनावणी झाली. यात मेहेत्रे आणि घुले यांच्या दोन्ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या.
अविश्वास ठरावावर दहा दिवसांच्या आत बैठक घोण्याचे आदेश
संतोष मेहेत्रे यांना गटनेत्या पदावरून दूर करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवत गटनेते म्हणून सतीश पाटील हेच अधिकृत गटनेते म्हणून काम पाहतील असा निर्वाळा दिला. तसेच कर्जत नगराध्यक्षा पदाच्या अविश्वास ठरावावर रखडलेली बैठक दहा दिवसांच्या आत घ्यावी असे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे कर्जत नगरपंचायतीचे पदाधिकारी बदलाची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली होती. मात्र आता यास पूर्णविराम मिळाला.



