DC : नगर : ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती, शाश्वत उपजीविका, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) जागी सुरू करण्यात आलेल्या ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण)’ या योजनेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा : माहितीचा अधिकार कायद्यातील बदलांना स्थगिती, अण्णांच्या इशाऱ्यामुळे सरकारचे नमते
यांची उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, उपजिल्हाधिकारी वर्षा पवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, विभागीय वन अधिकारी अमोल जाधव, उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक सुभाष सातपुते, रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे, जिल्हा एमआयएस समन्वयक विकास घिगे आदी मान्यवर उपस्थित होते.
नक्की पहा : अतिउत्साही गोरक्षकांचा शेतकऱ्याला फटका; श्रीरामपूर मध्ये नेमकं काय घडलं?
मजूर प्रतिनिधींचा सन्मान (DC)
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. हे अभियान केवळ रोजगार उपलब्ध करून देणारे नसून जलसंधारण, मृदसंधारण, वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या निर्मितीद्वारे शाश्वत विकास साधणारे आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रभावी अंमलबजावणीवर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.’ यावेळी अभियानात योगदान देणाऱ्या मजूर प्रतिनिधींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा एमआयएस समन्वयक विकास घिगे यांनी केले. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, ग्राम रोजगार सेवक तसेच मोठ्या संख्येने मजूर उपस्थित होते.



