Illegal Liquor : पाथर्डी : तालुक्यातील माळीबाभुळगाव येथे अवैध देशी दारू (Illegal Liquor) व हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या इसमाविरोधात पाथर्डी पोलिसांनी (Pathardi Police) कारवाई करत मोठा छापा टाकला. या कारवाईत ४४ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस अटक (Accused Arrested) करण्यात आली आहे.
नक्की वाचा : अरणगाव हादरलं! मुलानेच केली बापाची हत्या; नेमकं प्रकरण काय?
माहितीची खात्री करून तत्काळ कारवाईचे आदेश
मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना रविवारी (ता. ४) सायंकाळी माहिती मिळाली की, माळीबाभुळगाव येथील एक इसम घराच्या पाठीमागील भागात आडोशाला लपून देशी दारू तसेच हातभट्टी दारूची बेकायदेशीर विक्री करत आहे. या माहितीची खात्री करून तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले.
अवश्य वाचा : जन्म-मृत्यूचे दाखले ते नळ कनेक्शन मिळणार एका क्लिकवर!
छापा टाकण्यासाठी घटनास्थळी धाव (Illegal Liquor)
यानुसार पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, महिला पोलीस कॉन्स्टेबल अंजु सानप व इतर पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळच्या सुमारास करण्यात आलेल्या या छाप्यात आरोपी सुखदेव धोंडीराम तिजोरे (वय ५४, रा. माळी बाभुळगाव) हा घराच्या पाठीमागील भिंतीच्या आडोशाला लपून बसून देशी दारू व हातभट्टी दारू विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी परिसराची बारकाईने पाहणी केली असता आरोपीकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मुद्देमाल जप्त
१८० मि.ली.च्या ८ काचेच्या बाटल्यांमध्ये भरलेली ‘भिंगरी संत्रा’ देशी दारू (किंमत अंदाजे ६४० रुपये), प्लास्टिकच्या बॉटलमध्ये साठवलेली सुमारे १८ लिटर तयार हातभट्टी दारू (किंमत अंदाजे ३६०० रुपये), तसेच जमिनीत पुरून ठेवलेल्या दोन प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये साठवलेले सुमारे ४०० लिटर हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन (किंमत अंदाजे ४०,००० रुपये) असा एकूण ४४ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
गुन्हा दाखल
जप्त केलेल्या दारू व रसायनाचे नमुने वेगळे काढून ते रासायनिक विश्लेषण तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.उर्वरित दारू व रसायनाचा जागेवरच नाश करण्यात आला. आरोपीस ताब्यात घेऊन अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संजय जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव करीत आहेत.



