‘Ironman 70.3 Goa’ competition : अहिल्यानगरच्या पाच खेळाडूंनी यशस्वीरीत्या पूर्ण केली ‘आयर्नमॅन ७०.३ गोवा’ स्पर्धा 

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी अनुरागने ही अत्यंत खडतर स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली

0
'Ironman 70.3 Goa' competition : अहिल्यानगरच्या पाच खेळाडूंनी यशस्वीरीत्या पूर्ण केली 'आयर्नमॅन ७०.३ गोवा' स्पर्धा 
'Ironman 70.3 Goa' competition : अहिल्यानगरच्या पाच खेळाडूंनी यशस्वीरीत्या पूर्ण केली 'आयर्नमॅन ७०.३ गोवा' स्पर्धा 

‘Ironman 70.3 Goa’ competition : नगर : अहिल्यानगरच्या क्रीडा (Sports) क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी कामगिरीची नोंद झाली आहे. रविवारी (ता. १) गोवा येथे पार पडलेली जगप्रसिद्ध आणि आव्हानात्मक ‘आयर्नमॅन ७०.३ गोवा’ (Ironman 70.3 Goa) ही आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धा (International Triathlon Competition) अहिल्यानगरच्या पाच खेळाडूंनी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या यशस्वी चमूमध्ये आयर्नमॅन चेतन नवलानी यांच्यासह त्यांचे चार विद्यार्थी अक्षय गुरनाणी, अनमोल छाब्रिया, अनुराग छाब्रिया आणि वेदांत बोरुडे यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, एका शिक्षकाने स्वतःच्या विद्यार्थ्यांना या जागतिक दर्जाच्या आव्हानासाठी तयार करून त्यांच्यासह स्पर्धा पूर्ण करण्याची ही कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरत आहे.

नक्की वाचा : खासदार निलेश लंके, प्रताप ढाकणे यांचे जिल्हा बँकेच्या सत्ताधाऱ्यांवर मोठे आरोप; आरबीआयकडे तक्रार करण्याचा इशारा

प्रचंड चिकाटी यांची कसोटी पाहणारी ही स्पर्धा

‘हाफ आयर्नमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेत खेळाडूंना सलग तीन अत्यंत आव्हानात्मक टप्पे पूर्ण करावे लागतात. यामध्ये १.९ किलोमीटर समुद्रातील पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१.१ किलोमीटर धावणे अशा एकूण ११३ किलोमीटरच्या अंतराचा समावेश असतो. शारीरिक क्षमता, मानसिक ताकद, शिस्त आणि प्रचंड चिकाटी यांची कसोटी पाहणारी ही स्पर्धा जगभरातील Endurance Athletes साठी एक मोठे आव्हान मानली जाते.

या यशामध्ये विशेष लक्ष वेधून घेतले आहे ते अनुराग छाब्रिया याच्या कामगिरीने. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी अनुरागने ही अत्यंत खडतर स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. या कामगिरीसह तो अहिल्यानगरमधील सर्वात तरुण आयर्नमॅन ७०.३ फिनिशर ठरला आहे. त्याचे हे यश शहरातील तरुणांसाठी आणि नवोदित खेळाडूंसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. या चारही विद्यार्थ्यांना आयर्नमॅन चेतन नवलानी यांनी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले. चेतन नवलानी हे स्वतः हाफ आयर्नमॅन ७०.३ तसेच फुल आयर्नमॅन १४०.६ स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केलेले Endurance Athlete आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यशस्वीरीत्या स्पर्धा पूर्ण (‘Ironman 70.3 Goa’ competition)

शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक यश मिळवून देण्यापुरते मर्यादित न राहता त्यांच्यामध्ये शिस्त, आत्मविश्वास, जिद्द आणि स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची वृत्ती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्याच विचारातून त्यांनी आपल्या चार विद्यार्थ्यांना या आव्हानासाठी प्रेरित केले आणि स्वतः त्यांच्यासोबत मैदानात उतरून हे स्वप्न साकार केले. विशेष म्हणजे, या पाच जणांच्या चमूतील एकाही खेळाडूने माघार न घेता सर्वांनी यशस्वीरीत्या स्पर्धा पूर्ण केली. त्यामुळे या चमूने १०० टक्के यशाची नोंद केली आहे. अहिल्यानगरच्या एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांसोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हान स्वीकारून ते यशस्वीरीत्या पूर्ण करणे, ही केवळ क्रीडा क्षेत्रातील कामगिरी नसून शिक्षक-विद्यार्थी नात्यातून घडणाऱ्या प्रेरणादायी प्रवासाचे उत्तम उदाहरण आहे. या पाचही खेळाडूंच्या यशामुळे अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून शहरातील क्रीडाप्रेमी, नागरिक आणि विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.