नगर : राज्यात बंदी असलेल्या आणि संशयास्पद मानल्या जाणार्या एचटीबीटी (बोलगार्ड-3) (HTBT) या कापूस बियाण्यांच्या बेकायदेशीर विक्रीचे रॅकेट (Illegal cotton seed sales racket) कोपरगाव शहर (Kopargaon News) पोलीस व कृषी विभागाच्या संयुक्त कारवाईत उघडकीस आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे कापूस बियाणे राज्य परिवहन महामंडळाच्या बसमार्गे पार्सल सेवेद्वारे पाठवले जात असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. कारवाईसाठी गेलेल्या पथकाने जेव्हा येवला बसस्थानकावर धाड टाकली. त्यावेळी तेथे आलेल्या दोन गोण्यांची तपासणी केली असता त्यामध्ये 60 कापूस बियाण्यांची पाकिटे आढळून आली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : श्रीगोंद्यात थरार! ‘लिव्ह इन’मधील मैत्रिणीचा निर्घृण खून करून मृतदेह जाळला
आता नेमकं काय घडलं? (Kopargaon News)
कोपरगाव तालुक्यात संशयास्पद कापूस बियाण्यांची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाल्यानंतर बियाणे नियंत्रण निरीक्षक गणेश बिरदवडे यांनी स्वतः डमी ग्राहक बनून या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यांनी मुख्य संशयित अकील रज्जाक शेख याच्याशी मोबाईलवर संपर्क साधून बियाण्यांची मागणी केली. अकील शेख याने त्यांना साईबाबा कॉर्नर येथे बोलावले. त्यानुसार कृषी अधिकारी बिरदवडे आणि पोलीस अंमलदार प्रवीण रणधीर यांनी सापळा रचला. या भेटीदरम्यान आरोपीने सकाळीच एका शेतकर्याला तीन पाकिटे विकल्याची माहिती दिली तसेच दुपारी जळगावहून आणखी माल येणार असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
अवश्य वाचा : मान्सून संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार? हवामान विभागाने तारीख सांगितली

पोलीस चौकशीत आरोपीने जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील भगवती सीड्स येथून हे विनापरवाना बियाणे मागवत असल्याची कबुली दिली. ही बियाणे राज्य परिवहन महामंडळाच्या बस मार्गे पार्सल सेवेद्वारे पाठवली जात असल्याच यात समोर आले. या माहितीनंतर पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोपीचंद कांदळकर, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, मंडळ कृषी अधिकारी साईनाथ मलीक व पंचांसह पथकाने येवला बसस्थानकावर धाड टाकली व या गोण्या जप्त केल्यात.
कारवाई नेमकी कुणावर? (Kopargaon News)
जप्त करण्यात आलेल्या पाकिटांवर बोलगार्ड बीजी-11, वाण केसीएचएच-1049 असे नमूद करण्यात आले होते. तसेच कीर्तिमान अॅग्रो जेनेटिक्स लिमिटेड (औरंगाबाद), नर्मदा सागर अॅग्री सीड्स (गुजरात) आणि विश्वास अॅग्रोटेक (गुजरात) या कंपन्यांची नावे व पत्ते छापलेले आढळले. शेतकर्यांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने दिशाभूल करणारे लेबलिंग करण्यात आल्याचा संशय याप्रकरणी व्यक्त केला जात आहे. कृषी विभागाने पंचांसमक्ष नमुने घेऊन ते तपासणीसाठी नागपूरमधील केंद्रीय बियाण्यांच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
अकील रज्जाक शेख, छत्रपती संभाजीनगर येथील कीर्तिमान अॅग्रो जेनेटिक्स लिमिट्स या कंपीनीचा व्यवस्थापकीय संचालक, चोपडा येथील भगवती सीड्सचा मालक, गुजरात मधील नर्मदा सागर अॅग्री सीड्स प्रा.लि आणि गुजरातमधील साबरकांठा येथील विश्वास अॅग्रोटेक या कंपनीसह पाच जणांवर कारवाई करण्यात आली. ही घटना समोर आल्यानंतर कृषी विभागाने शेतकर्यांना अनधिकृत आणि संशयास्पद बियाण्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.



