
Kukadi And Ghod Dam : श्रीगोंदा : तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे. कुकडी व घोड धरणांमधून (Kukadi And Ghod Dam) पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून, घोड नदीवरील (Ghod River) सर्व बंधारेही भरून घेतले जाणार असल्याची माहिती आमदार विक्रम पाचपुते (Vikram Pachpute) यांनी दिली.
नक्की वाचा : अहिल्यानगरमध्ये पोलिसांची नाकाबंदी मोहीम; 1147 वाहनांवर कारवाई, साडेदहा लाखांचा दंड वसूल
कालवा सल्लागार समितीची बैठक
मंत्रालयात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार आणि राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळा’ अंतर्गत पुणे-कुकडी सिंचन मंडळाची रब्बी हंगाम २०२६-२७ कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार विक्रम पाचपुते यांनी श्रीगोंदा तालुक्यातील पर्जन्यमान आणि आगामी काळातील पाण्याची गरज लक्षात घेऊन पाण्याचे योग्य नियोजन करण्याची आग्रही भूमिका मांडली. नियोजित वेळापत्रकानुसार ५ तारखेला कुकडी धरणातून पाणी सोडले जाणार आहे, तर १० तारखेला घोड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येईल. यासोबतच घोड नदीवरील सर्व बंधारे भरून घेण्याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील शेती सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठा दिलासा मिळणार आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कुकडी व घोड लाभक्षेत्रात पाण्याची स्थिती चांगली (Kukadi And Ghod Dam)
श्रीगोंदा तालुक्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने भविष्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या कुकडी व घोड लाभक्षेत्रात पाण्याची स्थिती चांगली असली, तरी पुढे नियोजन बिघडल्यास पिकांसोबतच जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. चारा पिके तयार होण्यासाठी ३ ते ४ महिने लागत असल्याने, ऐनवेळी चारा टंचाई भासू नये म्हणून आतापासूनच शेतीच्या पाण्यासोबत जनावरांच्या चाऱ्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्याने पाणीवाटप निश्चित करावे, अशी मागणी आमदार पाचपुते यांनी मंत्री महोदयांकडे केली. धरणांतून पाणी सोडण्याच्या या निर्णयामुळे आणि आमदार विक्रम पाचपुते यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


