Kukadi Cooperative Sugar Factory : कुकडी साखर कारखान्यावर जिल्हा बँकेची जप्तीची कारवाई; ३७० कोटींच्या थकबाकीपोटी मालमत्ता ताब्यात

Kukadi Cooperative Sugar Factory : कुकडी साखर कारखान्यावर जिल्हा बँकेची जप्तीची कारवाई; ३७० कोटींच्या थकबाकीपोटी मालमत्ता ताब्यात

0
Kukadi Cooperative Sugar Factory : कुकडी साखर कारखान्यावर जिल्हा बँकेची जप्तीची कारवाई; ३७० कोटींच्या थकबाकीपोटी मालमत्ता ताब्यात
Kukadi Cooperative Sugar Factory : कुकडी साखर कारखान्यावर जिल्हा बँकेची जप्तीची कारवाई; ३७० कोटींच्या थकबाकीपोटी मालमत्ता ताब्यात

Kukadi Cooperative Sugar Factory : श्रीगोंदा : अहिल्यानगरमधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Ahilyanagar District Central Cooperative Bank) थकीत ३७० कोटींच्या कर्जाच्या वसूलीपोटी श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर (Kukadi Cooperative Sugar Factory) कारखान्यांची चल व अचल मालमत्ता ताब्यात घेण्याची कायदेशीर कारवाई (Legal action) सोमवार (ता.१) पासून सुरू केली आहे. सरफेसी कायदा २००२ मधील तरतुदींनुसार जिल्हा बँकेने कारखान्यांचा ताबा घेण्याची आणि मालमत्ता सील करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, ऐन जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आ. राहुल जगताप (Rahul Jagtap) यांच्या कारखान्यावर जिल्हा बँकेने कारवाई उगारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नक्की वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात चार लाख २६ हजार असंकलित मतदार; सुनिल गाढे यांची माहिती

थकीत कर्ज भरण्यासाठी कोणतीही कार्यवाही नाही

गेल्या दोन वर्षापासून जगताप यांचा कुकडी साखर कारखाना सुरू होवू शकलेला नाही. या कारखान्यांसाठी जगताप यांनी जिल्हा बँकेकडून घेतलेले कर्ज व त्याचे व्याज असे मिळून ३७० कोटींचा बोजा झालेला आहे. या थकीत कर्जाच्या वसूलीपोटी बँकेच्यावतीने जानेवारी २०२६ मध्ये कुकडी कारखान्याला नोटीस बजावण्यात आली होती. तसेच ६० दिवसांची मुदत देवून कर्जासह संबंधीत नोटीसीला उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सुमारे ७महिन्यांच्या कालावधीत जगताप अथवा कारखाना यांच्यावतीने थकीत कर्ज भरण्यासाठी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही, असे बँकेच्यावतीने सांगण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

जिल्हा बँकेच्या एनपीएच्या रकमेत वाढ (Kukadi Cooperative Sugar Factory)

जिल्हा बँकेच्या कर्जाची थकबाकीची रक्कम ३७० कोटींवर पोहचली असून यामुळे जिल्हा बँकेच्या एनपीएच्या रक्कमेत वाढ झालेली आहे. यामुळे बँकेच्या वतीने ३१ ऑगस्टला कारखान्यावर जप्ती व सुपुर्तनामा (ताबा) घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली. त्यानंतर सोमवार १ सप्टेंबर कुकडी कारखान्यावर जप्तीची नोटीस डकवण्यात आली असून त्या ठिकाणी बँकेच्या मालकीचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत. कारवाईसाठी बँकेने सरव्यवस्थापक (कर्ज व देखरेख) एस. आर. पाटील यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

प्राधिकृत अधिकारी पाटील आणि बँकेचे अधिकारी कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक यांच्याशी चर्चा करून संपूर्ण चल व अचल मालमत्ता ताबा घेतील. या प्रक्रियेचा प्रत्यक्ष पंचनामा केला जाणार आहे. ताबा घेण्याच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक (अहिल्यानगर) व श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या मदतीने पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ताबा घेतल्यानंतर संपूर्ण कारखान्याची पाहणी करून मालमत्तेला तातडीने सील ठोकण्यात आले. या संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहावी, यासाठी फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग करण्यात आले. ताबा पूर्ण झाल्यावर मालमत्तेच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक (सिक्युरिटी गार्ड व गनमेन) तैनात करण्यात आले. बँकेच्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना या कारवाईत जबाबदारीने सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकेच्या या धडक कारवाईमुळे साखर कारखाना क्षेत्रात आणि स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासाठी पुढील महिन्यांत निवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत कोण कोणासोबत आणि कोण कोणाच्या विरोधात राहणार याचा अंदाज बांधण्यात येत असतांना श्रीरामपूरचे ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे यांच्या ताब्यात असणाऱ्या अशोक बँकवर कारवाई झाली आहे. आता दक्षिणेतील श्रीगोंद्याचे माजी आ. राहुल जगताप यांच्या कुकडीवर कारवाई झाली असून आता तिसरा नंबर कोणाचा याबाबत जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरूवात झाली आहे.

राहुरी कारखान्यापाठोपाठ जिल्हा बँकेने श्रीगोंद्यातील कुकडी हा दुसरा कारखाना ताब्यात घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आ. राहुल जगताप यांच्या अधिपत्याखालील या कारखान्यावर सत्तेवर असतांनाही कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील एका भाजपच्या बड्या नेत्यांकडून जगताप कारखाना चालविण्यास घेण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यांच्या प्रयत्नामुळे कारखान्यावर जप्तीची कारवाई काही दिवस लांबणीवर पडली होती. त्यातूनच नोटीस बजावली गेली, तरी मुदत वाढही दिली गेली. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर संबंधीत नेत्याने ऐनवेळी कारखाना चालवण्यास नकार दिल्याने ही कारवाई झाल्याचे सांगण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी) मार्फत कुकडी कारखान्याला पतपुरवठा मंजूर करण्यास प्रयत्न केलेले आहे. या प्रयत्नांना यश आलेले असून पुढील महिन्यांत हा पतपुरवठा मंजूर होवून निधी उपलब्ध होताच जिल्हा बँकेच्या कर्जाचा विषय मार्गी लागणार आहे.

  • माजी आ. राहुल जगताप, कुकडी सहकारी साखर कारखाना