Kukadi Project : ‘डीवाय १०’ चारीची दुरुस्ती करा, अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन; पल्लवी पोटे यांचा इशारा

चारीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपे आणि गाळ साचल्याने पाण्याचा प्रवाह मंदावला

0
Kukadi Project : 'डीवाय १०' चारीची दुरुस्ती करा, अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन; पल्लवी पोटे यांचा इशारा
Kukadi Project : 'डीवाय १०' चारीची दुरुस्ती करा, अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन; पल्लवी पोटे यांचा इशारा

Kukadi Project : श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पांतर्गत (Kukadi Project) श्रीगोंदा शहराच्या हद्दीतील अत्यंत महत्त्वाच्या ‘डीवाय १०’ चारीची (‘DY-10’ Canal) प्रचंड दुरवस्था झाली आहे. या चारीची तातडीने दुरुस्ती, साफसफाई आणि आवश्यक तिथे अस्तरीकरण करण्यात यावे अन्यथा कुकडी पाटबंधारे कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्रीगोंदा नगरपरिषदेच्या (Shrigonda Municipal Council) नगरसेविका पल्लवी पांडुरंग पोटे यांनी पाटबंधारे विभागाला कुकडी पाटबंधारे उपविभागाच्या उपअभियंत्यांना लेखी निवेदन देत दिला आहे.

नक्की वाचा : औरंगपूर प्रकरण तापले; माजी सैनिक संघटना आक्रमक

चारीची पाणी वहन क्षमता घटली

निवेदनात म्हटले आहे की, ‘डीवाय १०’ चारीवर परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती व सिंचन व्यवस्था अवलंबून आहे. मात्र देखभालीअभावी ही चारी अनेक ठिकाणी पूर्णपणे बुजली आणि खचली असून तिचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. पाटबंधारे विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे चारीची पाणी वहन क्षमता कमालीची घटली आहे. चारी अनेक ठिकाणी फुटल्यामुळे आणि अस्तरीकरण नसल्यामुळे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत नाही. तसेच चारीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडी-झुडपे आणि गाळ साचल्याने पाण्याचा प्रवाह मंदावला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळण्यात मोठ्या अडचणी येत असून मौल्यवान पाण्याचा अपव्यय होत आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

चारीची संपूर्ण दुरुस्ती व साफसफाई करण्याची मागणी (Kukadi Project)

पाटबंधारे विभागाने तातडीने दखल घेऊन, ‘डीवाय १०’ चारीची संपूर्ण दुरुस्ती व साफसफाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यात प्रशासनाने टाळाटाळ केल्यास कुकडी पाटबंधारे कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पोटे यांनी दिला आहे.