Legislative Council Election : बिनविरोधवरून राजकीय नाट्य; दत्ता पानसरे यांचा आत्महत्येचा इशारा तर भाजपचे कार्यकर्तेही आक्रमक

अर्ज माघारी घेतल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

0
Legislative Council Election : बिनविरोधवरून राजकीय नाट्य; दत्ता पानसरे यांचा आत्महत्येचा इशारा तर भाजपचे कार्यकर्तेही आक्रमक
Legislative Council Election : बिनविरोधवरून राजकीय नाट्य; दत्ता पानसरे यांचा आत्महत्येचा इशारा तर भाजपचे कार्यकर्तेही आक्रमक

Legislative Council Election : नगर : विधान परिषदेच्या (Legislative Council Election) अहिल्यानगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत आज (ता. ४) उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीत भाजपचे प्राजक्त तनपुरे व अपक्ष उमेदवार दत्तात्रेय पानसरे (Dattatray Pansare) या दोघांचेच उमेदवारी अर्ज शिल्लक असल्याने त्यांच्यात लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या अर्जावर खोटी सही करून अर्ज दाखल केल्याचा आरोप दत्ता पानसरे यांनी करत आत्महत्येचा इशारा दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात राजकीय नाट्य रंगले आहे. दत्ता पानसरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला आहे. तर प्रशासनाने अंतिम यादी तातडीने जाहीर करावी या मागणीसाठी भाजपचे (BJP) कार्यकर्तेही आक्रमक झाले होते.

नक्की वाचा : कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक; भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून सरकारच्या आदेशाची होळी

ससाणे यांच्यासह तीन जणांचे अर्ज मागे

विधान परिषद निवडणुकीतील अर्ज माघारीचा शेवटचा दिवस राजकीय नाट्यपूर्ण घटनाक्रमांनी गाजला. अहिल्यानगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत पाच जणांचे उमेदवारी अर्ज होते. यात भाजपचे प्राजक्त तनपुरे तर चार उर्वरित सर्व अपक्ष उमेदवारी अर्ज होते. उमेदवारी अर्ज माघारीसाठी दोन दिवस होते. त्यातील काल (ता. ३) एकही जण उमेदवारी अर्ज माघारीसाठी आला नाही. त्यामुळे आजच्या घटनाक्रमावर राज्याचे लक्ष लागले होते. सकाळपासूनच अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय वातावरण तापले होते. श्रीरामपूरमधील काँग्रेसचे नेते करण ससाणे यांच्यासह तीन जणांनी आज दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेतले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अर्ज माघारी घेतल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल (Legislative Council Election)

अर्ज माघारी घेण्याची शेवटची वेळ तीन वाजेपर्यंत होती. शेवटी प्राजक्त तनपुरे व दत्तात्रेय पानसरे या दोघांचेच उमेदवारी अर्ज उरले होते. पानसरे यांचे स्वीय सहाय्यक अर्ज माघारीचा कोरा अर्ज घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित होते. मात्र, त्याच वेळी पानसरे यांनी अर्ज माघारी घेतल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरू लागल्या. पानसरे यांचा भ्रमणध्वनी बंद होता. मात्र, तीन वाजेच्या अवघ्या काही मिनिटे अगोदर पानसरे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले.

पानसरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ठिय्या

माझी खोटी स्वाक्षरी करत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच प्रशासनाला अर्ज माघारी घेतल्यास आत्महत्येचा इशारा दिल्याने एकच खळबळ उडाली. पानसरे यांनी रागाच्या भरात पणन महासंघाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावरही नाराजी व्यक्त केली. मी अर्ज माघारी घेतलेला नाही. ही माझी स्वाक्षरी नाही. माझा माघारी अर्जा शिवाय अर्ज माघारी का? घेतला असे म्हणत त्यांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. त्यामुळे मोठा राजकीय व प्रशासकीय पेच निर्माण झाला आहे. 

दत्तात्रेय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतला गेला अथवा नाही, याबाबत प्रशासकीय भूमिका जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना घ्यावी लागणार आहे. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या राजकीय नाट्याने ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.