Mahadji Shinde Palace : महादजी शिंदे राजवाडा वारसा स्मारक व्हावे; शिवदुर्गचे तहसीलदारांना निवेदन

0
महादजी शिंदे राजवाडा वारसा स्मारक व्हावे; शिवदुर्गचे तहसीलदारांना निवेदन
महादजी शिंदे राजवाडा वारसा स्मारक व्हावे; शिवदुर्गचे तहसीलदारांना निवेदन

Mahadji Shinde Palace : नगर : श्रीगोंदा ही शिंदे सरदार व असंख्य पानिपत वीरांची भूमी आहे. इथे पानिपत वीरांच्या स्मृती जपणाऱ्या अनेक वारसा स्मारके उभी आहेत, मात्र ही सर्व वारसा स्मारके सध्या जनसामान्य नागरिकांच्या नजरेआड गेली असून काळानुरूप त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. या पार्श्वभूमीवर, महादजी शिंदे राजवाडा आणि इतर ऐतिहासिक स्थळांना ‘वारसा स्मारक’ म्हणून घोषित करावे, या मागणीसाठी शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनच्या वतीने श्रीगोंद्याचे तहसीलदार सचिन डोंगरे व भूमी अभिलेख कार्यालयाला महत्त्वाचे निवेदन देण्यात आले.

नक्की वाचा : ‘वंशाचा दिवा’ नव्हे, विचारांची मशाल! श्रीगोंद्यात आईच्या पार्थिवाला मुलींचा खांदा

निवेदनात ‘ही’ मागणी

शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेच्या माध्यमातून शासकीय पातळीवर हा सर्व ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी अनेक वर्षांपासून अविरत प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुरातत्व विभागाच्या माध्यमातून ही सर्व स्मृती स्थळे संवर्धित होऊन पानिपत वीरांची आठवण म्हणून पुढील पिढीसाठी वारसा स्मारक घोषित होणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय अंमलबजावणी व कागदपत्रांची पूर्तता श्रीगोंदा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेने तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी शिवदुर्ग संस्थेचे अध्यक्ष राजेश इंगळे, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. गोरख कडूस, वारसा संवर्धन समितीचे उपाध्यक्ष सचिन भोसले आणि अमोल बडे उपस्थित होते.

हेही वाचा : कारखानदार विरुद्ध सोसायटी संघर्ष उभा राहणार? प्रस्थापितांच्या एकीला सोसायटी मतदारांचा ‘खो’; सवलतींच्या मुद्द्यावर कारखानदारांना घेरले

“पुरातत्व व पर्यटन विभागाच्या माध्यमातून श्रीगोंदा शहरात भव्य पानिपत वीरांचे स्मारक व्हावे आणि शिंदेशाही घराण्याचे पुरातन वास्तू संग्रहालय निर्माण व्हावे, हीच प्रत्येक श्रीगोंदेकराची इच्छा आहे. तसेच, श्रीगोंदा शहरातील योग्य आणि दर्शनी चौकात राणोजी शिंदे, दत्ताजी शिंदे, जयप्पा शिंदे, जनकोजी शिंदे व महादजी शिंदे यांच्या शौर्यशाली पराक्रमाचे चित्रशिल्प निर्माण केले जावे, अशा जनभावना आहेत. आम्ही शिवदुर्ग संस्थेच्या माध्यमातून याच जनभावना प्रशासनासमोर प्राधान्याने मांडत आहोत.”

– राजेश इंगळे (अध्यक्ष, शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन)

पुढील पिढीसाठी पाऊलखुणा वाचवणे गरजेचे (Mahadji Shinde Palace)

श्रीगोंदा शहरातील दिल्ली वेस, पानिपत शौर्य वेस, महादजी शिंदे राजवाडा, पूर्व वेस, मैनाबाई माळावरील छत्री समाधी, महादजी शिंदे पादुका स्मारक, ऐतिहासिक बारवा व पानिपत वीरांच्या संदर्भातील सर्व पाऊलखुणा पुढील पिढीसाठी वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग, सहाय्यक संचालक नाशिक यांच्याकडे संस्थेचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. पर्यटन व पुरातत्व विभागाने यापूर्वीच्या निवेदनांची दखल घेऊन तहसीलदार यांच्या माध्यमातून श्रीगोंदा शहरातील पानिपत वारसा स्मारकांची माहिती मागवली आहे. त्यामुळे या वारसा स्मारकांची अद्ययावत भूराजस्व माहिती प्रशासनाने प्राधान्य क्रमाने व तातडीने पाठवून सहकार्य करावे, अशी विनंतीही या निवेदनात करण्यात आली आहे.