
Mahavitaran : पारनेर : शहरातील न्यू इंग्लिश स्कूल ते पारनेर महाविद्यालय या वर्दळीच्या मार्गावर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) गलथान कारभाराचे दर्शन घडले आहे. वीज पुरवठा (Power Supply) सुरळीत करण्याच्या नावाखाली झाडांच्या फांद्या (Tree Branches) छाटणाऱ्या महावितरणच्या (Mahavitaran) कर्मचाऱ्यांनी या फांद्या चक्क रस्त्याच्या मध्यभागी आणि बाजूलाच पडून ठेवल्या आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून या फांद्यांचा ढीग तसाच पडून असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असून वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
नक्की वाचा : कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा पदासाठी भाजपच्या छाया शेलार यांचा एकमेव अर्ज दाखल
महावितरणच्य कार्यपद्धतीवर आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह
महावितरणचा हा बेजबाबदारपणा इतका टोकाचा आहे की, त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी काशिनाथ दाते यांच्या निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच या फांद्यांचा ढीग रचून ठेवला आहे. लोकप्रतिनिधींच्या घराच्या वाटेवरच अशा प्रकारे कचरा आणि फांद्या टाकून ठेवल्यामुळे महावितरणच्य कार्यपद्धतीवर आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. प्रशासकीय जबाबदारीचे भान हरवलेल्या या कृत्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गंभीर दुर्घटना घडण्याची भीती (Mahavitaran)
न्यू इंग्लिश स्कूल ते पारनेर महाविद्यालय हा परिसर शैक्षणिक संस्थांचा असल्याने येथे विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची मोठी वर्दळ असते. या मार्गावर फांद्यांचा ढीग अस्ताव्यस्त पडल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची ये-जा करताना कसरत करावी लागत असून, सायंकाळच्या वेळी अंधारामुळे येथे छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः शाळा सुटण्याच्या वेळी विद्यार्थ्यांची होणारी गर्दी आणि रस्त्यावर पसरलेला फांद्यांचा कचरा यामुळे गंभीर दुर्घटना घडण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.
साफसफाईच्या नियमांचे उल्लंघन
महावितरणच्या वतीने वीज तारांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या छाटणे ही एक नियमित प्रक्रिया आहे. मात्र, या फांद्यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारीही महावितरणचीच आहे. फांद्या तोडून त्या तशाच रस्त्यावर सोडून देणे, हे साफसफाईच्या नियमांचे उल्लंघन आहे. पारनेरमधील या प्रकारामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “केवळ वीज तारा वाचवण्यासाठी फांद्या तोडल्या, मग त्या उचलण्याची तसदी का घेतली जात नाही?” असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. जर तातडीने या फांद्या उचलल्या नाहीत, स्थानिक नागरिकांच्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
आता महावितरण प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने रस्ता मोकळा करते की, पुन्हा एकदा ‘कामाचा बोजवारा’ उडवणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.या प्रकरणावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे


