Marathi Language : नगर : राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावर राज्य सरकारने आता ठोस पाऊल उचलले आहे. परप्रांतीय चालक आणि विविध संघटनांनी केलेल्या मागणीचा विचार करून, सरकारने चालकांना मराठी शिकण्यासाठी १५ ऑगस्ट २०२६ पर्यंतची मुदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीत घेतला आहे.
हेही वाचा : अन्न प्रशासनाच्या तीन अधिकाऱ्यांचे निलंबन!; सुपारी विरोधातील कारवाई प्रकरण भोवले
सरकारची सर्वतोपरी मदत
कॅबिनेट बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, केवळ सक्ती न करता चालकांना ही भाषा आत्मसात करता यावी यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे. १ मे ते १५ ऑगस्ट या कालावधीत चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक ज्ञान अवगत करावे लागेल. चालकांसाठी विशेष ‘मराठी शिक्षण पुस्तिका’ तयार करण्यात आली आहे. ही पुस्तिका राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये उपलब्ध असेल. ही पुस्तिका मोबाईलवरही पाहता येईल. विशेष म्हणजे, यामध्ये कोड देण्यात आला असून त्याद्वारे चालक ऑडिओ स्वरूपात उच्चार आणि संवाद ऐकू शकतील. या पुस्तिकेत प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची १५ ते १६ वाक्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
नक्की पहा : अहिल्यानगर – छत्रपती संभाजी नगर रस्त्यावर पुन्हा अपघात; एका महिलेचा मृत्यू
चालकांसाठी मराठीचे वर्ग (Marathi Language)
ज्या रिक्षा-टॅक्सी संघटनांनी मराठी शिकण्यासाठी वेळ मागितला होता, त्यांना आता सरकारने संधी दिली आहे. संघटनांनी स्वतःहून पुढाकार घेत आपल्या कार्यालयांत किंवा शाखांमध्ये चालकांसाठी मराठीचे वर्ग भरवावेत, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले आहे. या निर्णयामुळे आता मुंबई, पुणे यांसारख्या शहरांतील हिंदी भाषिक चालकांना मराठी भाषेचे धडे गिरवावे लागणार आहेत. १५ ऑगस्टनंतर या संदर्भात काय भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



