
MLA Dr. Kiran Lahamte : अकोले : तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील (Tribal Area) ग्राहकांना एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder) मिळवण्यासाठी होणार्या तांत्रिक अडचणींबद्दल आमदार डॉ. किरण लहामटे (MLA Dr. Kiran Lahamte) यांनी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची भेट घेतली आहे.
नक्की वाचा : घरगुती वादातून तरुण चढला मोबाईलच्या टॉवरवर; जीव देण्याची धमकी
सिलेंडर मिळवण्यासाठी अनेक अडचणी
अकोले विधानसभा मतदारसंघ दुर्गम आदिवासी भाग असून एलपीजी ग्राहकांना सिलेंडर मिळवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच दुर्गम भागात नेटवर्क नसल्यामुळे व आदिवासी भागातील लोक मोबाईल रिचार्ज करत नसल्यामुळे डीएसी कोड प्राप्त होत नाही. आगामी दिवसांत पावसाला सुरुवात होणार असल्याने अडचणी अधिक वाढणार असून मोबाईल टॉवर व अखंडित विद्युत पुरवठ्यामुळे डीएसी कोड प्राप्त करण्यासाठी अडचण येऊ शकतात. त्यासाठी 20 ते 30 टक्के डीएसी कोड न घेता इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, हरसूल व इतर दुर्गम भागांसारखी डिलिव्हरी डन करण्याची शिथिलता माझ्या मतदारसंघातील सर्व गॅस वितरकांना देण्यात यावी, अशी मागणी आमदार लहामटे यांनी मंत्री भुजबळ यांच्याकडे पत्रान्वये केली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
बुकिंगचा कालावधी 25 दिवस करण्याची मागणी (MLA Dr. Kiran Lahamte)
तसेच सिलेंडर बुकिंगचा कालावधी सध्या 45 दिवस आहे तो कमी करून 25 दिवस करण्यात यावा. अन्यथा इंधन म्हणून पर्यायाने लाकडांचा वापर वाढेल व परिणामी वृक्षतोड होईल. तसेच आधारकार्ड वेळेत ऑनलाइन अपडेट न झाल्यामुळे अनेक उज्ज्वला गॅस ग्राहकांचे दोन वेगवेगळे आधार नंबर तयार झाले आहे. त्यामुळे ई-केवायसी होत नाही व नवीन आधार नंबर कंपनीच्या सॉफ्टवेअरला अॅड करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. या विषयांचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार लहामटे यांनी केली आहे.


