Monsoon News : नगर : देशातील बळीराजा आणि अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाची बातमी (News) आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सन २०२६ च्या नैऋत्य मोसमी पावसाचा (Monsoon) पहिला दीर्घकालीन अंदाज प्रसिद्ध केला आहे. यावर्षी मान्सून ‘सरासरीपेक्षा कमी’ (Below Normal) राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा : सामाजिक समता सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशभर सरासरीच्या ९२% पाऊस पडण्याची शक्यता आहे. १९७१-२०२० या काळातील पावसाची सरासरी ८७ सेंमी आहे. यंदाचा पाऊस याच सरासरीच्या तुलनेत ९२% राहण्याचा अंदाज आहे. देशातील बहुतांश भागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल. मात्र, ईशान्य भारत, वायव्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पातील काही भागांत पाऊस सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
एल निनोचा प्रभाव
सध्या पॅसिफिक महासागरात ‘ला निना’ची स्थिती कमकुवत होऊन ती न्यूट्रल होत आहे. मात्र, मान्सूनच्या काळात ‘एल निनो’ परिस्थिती विकसित होण्याची शक्यता ‘मॉन्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टिम’ने वर्तवली आहे, ज्याचा परिणाम पावसावर होऊ शकतो. याशिवाय हिंदी महासागरात सध्या ‘इंडियन ओशन डायपोल’ न्यूट्रल स्थितीत असून मान्सूनच्या उत्तरार्धात तो सकारात्मक होण्याची शक्यता आहे. उत्तर गोलार्धात आणि युरेशियातील बर्फाच्छादनाचे प्रमाण गेल्या तीन महिन्यांत (जानेवारी ते मार्च) सरासरीपेक्षा किंचित कमी होते.
नक्की पहा : ती सर्व खाती बनावट; प्रतिभा चाकणकर यांचे स्पष्टीकरण
पुढील अंदाज कधी? (Monsoon News)
हवामान खात्याच्या नवीन धोरणानुसार, मान्सूनचा सुधारित आणि अधिक सविस्तर अंदाज मे २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. यामध्ये जून महिन्याचा स्वतंत्र अंदाज आणि देशातील चार प्रमुख भौगोलिक विभागांनुसार पावसाची माहिती दिली जाईल.



