Yogiraj Gade | व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी; नगरसेवक योगीराज गाडेसह १४ जणांवर गुन्हा दाखल

0

Yogiraj Gade | नगर : राहुरी विधानसभा पोट निवडणुकीसंदर्भात सोशल मीडियावर (फेसबुक) टाकलेल्या एका पोस्टचा राग धरून नगरसेवकासह इतरांनी एका ट्रॅव्हल्स व्यावसायिकाला फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शिवसेना (उध्दव ठाकरे) गटाचे अहिल्यानगर महापालिकेचे नगरसेवक योगीराज शशीकांत गाडे (रा. अहिल्यानगर) (Yogiraj Gade) यांच्यासह इतर वेगवेगळ्या १४ मोबाईल नंबरधारक व्यक्तींविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत व्यावसायिक घनश्याम दत्तात्रय बोडखे (वय ४८, रा. बुऱ्हानगर, ता. अहिल्यानगर) यांनी तक्रार दिली आहे.

हे वाचा – महिलांच्या सुरक्षेसाठी ‘वन स्टॉप सेंटर’ ठरतेय मोठा आधार; केंद्राच्या माध्यमातून १ हजार ४११ महिलांना मिळाली मदत

दोन दिवसांनी गुन्हा दाखल (Yogiraj Gade)

ही घटना तक्रारदार १० एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास अहिल्यानगर शहरातील गांधी मैदान येथे असताना घडली. या संदर्भात गुन्हा रविवारी (ता. १२) रात्री  दाखल झाला आहे. तक्रारदार घनश्याम बोडखे यांनी राहुरी विधानसभा पोट निवडणुकीसंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट प्रसारित केली होती. या पोस्टचा राग मनात धरून नगरसेवक गाडे व इतर काही अनोळखी व्यक्तींनी बोडखे यांना वारंवार फोन केले. 

अवश्य वाचा – रुपाली चाकणकरांच्या बहिणीने सर्व आरोप फेटाळले; ‘ती’ खाती बनावट असल्याचे स्पष्टीकरण

फोन करून शिवीगाळ (Yogiraj Gade)

१० एप्रिल पासून वेळोवेळी या सर्वांनी बोडखे यांना फोन करून शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत नमूद आहे. सतत येणाऱ्या धमकीच्या फोनमुळे बोडखे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी योगिराज गाडे याच्यासह सुमारे १४ मोबाइल क्रमांक धारक अनोळखी व्यक्तींविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार सोनवणे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here