Mummaka Sudarshan : अहिल्यानगर जिल्हा अमली पदार्थ मुक्त करणार : मुम्मका सुदर्शन

अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाची ६ ऑगस्टला अंमली पदार्थविरोधी जनजागृती रॅली

0
Mummaka Sudarshan : अहिल्यानगर जिल्हा अमली पदार्थ मुक्त करणार : मुम्मका सुदर्शन
Mummaka Sudarshan : अहिल्यानगर जिल्हा अमली पदार्थ मुक्त करणार : मुम्मका सुदर्शन

Mummaka Sudarshan : नगर : युवा पिढीचे संरक्षण हे समाजाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून अंमली पदार्थांचे (Narcotics) समूळ उच्चाटन करण्यासाठी सातत्याने पोलीस प्रशासनाकडून (Police Administration) प्रयत्न सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेलगत पुणे, नाशिक आणि मुंबईशी असलेले भौगोलिक जवळीक लक्षात घेता एमडीसारख्या अमली पदार्थांची गुप्त मार्गाने तस्करी व विक्री होत असल्याचे तपासात समोर येत आहे. या साखळीच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष तपास केला जाईल असे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका (Mummaka Sudarshan) यांनी सांगितले.

नक्की वाचा : सुनेत्रा पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टचा निषेध; संग्राम जगताप यांची काँग्रेसवर टीका

जनजागृती रॅलीचे आयोजन

पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन कारण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमे आणि शहर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे उपस्थित होते. तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करून व्यसनमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने आणि जिल्हा ड्रग्जमुक्त करण्याच्या संकल्पातून अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गुरुवार (ता. ६) रोजी सकाळी ७.३० वाजता पोलीस मुख्यालयातून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीदरम्यान नागरिकांना नशामुक्तीची शपथही देण्यात येणार आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमे आणि शहर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न (Mummaka Sudarshan)

या रॅलीत शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, वकील, पत्रकार, लोकप्रतिनिधी, डॉक्टर, शांतता समितीचे सदस्य, विविध धर्मांचे धर्मगुरू, सायकलिंग संघटना, क्रीडा संस्था, सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.युवा पिढीचे संरक्षण हे समाजाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी सांगितले. जिल्ह्याचे पुणे, नाशिक आणि मुंबईशी असलेले भौगोलिक जवळीक लक्षात घेता एमडीसारख्या अमली पदार्थांची गुप्त मार्गाने तस्करी व विक्री होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या साखळीच्या मूळ स्रोतापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.गेल्या काही दिवसांत शाळांच्या परिसरातील टपऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून पुन्हा विशेष कारवाई केली जाणार आहे.

आत्तापर्यंत ३५५ आरोपींवर कारवाई

तसेच वाहतूक शिस्तीसाठी ट्रिपल सीट, विनानंबर प्लेट आणि नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई सुरू असून महिलांच्या सुरक्षेसाठीही विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत अंमली पदार्थांच्या २९७ गुन्ह्यांमध्ये ३५५ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून सुमारे ६४० किलो अंमली पदार्थ आणि १ कोटी ७८ लाख ५७ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ड्रग्ज प्रकरणात १३ संशयितांना अटक करण्यात आली असून काही आरोपींचा शोध सुरू असल्याने त्यांची नावे सध्या जाहीर करण्यात आलेली नाहीत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनी दिली.

जिल्ह्यात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘टू प्लस टू’ योजनेअंतर्गत विशेष कारवाई राबविण्यात येणार असून प्रत्येक पोलीस ठाणास्तरावर स्वतंत्र पथके स्थापन केली जाणार आहेत. टाकळी ढोकेश्वर येथे नव्या पोलीस ठाण्याला मंजुरी मिळाली असली तरी मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतरच ते कार्यान्वित होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.