
National Award : नगर : जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील तांभेरे गावचा सुपुत्र आदित्य डेरे यांचा देशपातळीवर गौरव झाला असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल थेट केंद्र सरकारने घेतली आहे. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या तंबाखू मुक्त युवा अभियान 3.0 या राष्ट्रीय कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे आदित्य डेरे यांना विशेष आमंत्रित करत मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशामुळे राहुरी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा : २०-२२ एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता
उल्लेखनीय योगदान (National Award)
सोशल मीडियावर लाखो प्रेक्षकसंख्या असलेले आदित्य डेरे हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम बनले आहेत. युट्यूब, इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवरून ते व्यसनमुक्तीचा संदेश देत तरुणांना योग्य दिशेने प्रेरित करत आहेत. महिला सशक्तीकरण, महिला सुरक्षा यांसारख्या संवेदनशील विषयांवर त्यांनी उचललेले पाऊल विशेष उल्लेखनीय ठरत आहे. तसेच, पोलीस प्रशासनाला सहकार्य करत समाजातील सकारात्मक बदलासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल राज्य शासनानेही घेतली असून मुंबई येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे विशेष कौतुक केले होते. आता केंद्र सरकारकडून मिळालेला हा सन्मान त्यांच्या कार्याला नवी उंची देणारा ठरला आहे.
नक्की पहा : नेवासा मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन (National Award)
आदित्य डेरे म्हणाले, “हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्यावर प्रेम करणाऱ्या एक कोटी लोकांचा आहे. त्यांच्या विश्वासामुळेच मला ही संधी मिळाली. यापुढे अधिक जबाबदारीने आणि जोमाने समाजासाठी काम करण्याची प्रेरणा या सन्मानातून मिळाली आहे.”आदित्य डेरे यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असून ‘सोशल मीडियाचा योग्य वापर केला, तर तो समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन ठरू शकतो’, याचे ते जिवंत उदाहरण ठरत आहेत.


