नगर : नेपाळमध्ये आज बुधवारी (ता.२६) सकाळी अचानक आलेल्या महापुरामुळे (Nepal Flood)सीमावर्ती भागातील वस्त्यांमध्ये प्रचंड हाहाकार माजला आहे. या आपत्तीमुळे सखल भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी (High alert issued) करण्यात आला आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या दरम्यान ‘भोटेकोशी’ नदीला अचानक भीषण पूर (Flood) आला. हा पुराचा पाण्याचा लोट तिबेटच्या बाजूने आल्याचे सांगण्यात येत आहे.
नक्की वाचा : मराठा-कुणबी वंशावळ समितीला पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ
७ जणांचा मृत्यू, २५ जणांना वाचवण्यात यश (Nepal Flood)
नेपाळी सैन्याच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, रसुवा जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारपर्यंत कमीत कमी २५ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे रसुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि लगतच्या स्याफ्रुबेसी परिसरात प्रचंड नुकसान झाले असून अनेक वाहने, सामान व मालमत्ता वाहून गेली आहे. रसुवा जिल्हा काठमांडूच्या ईशान्येकडे स्थित असून तिबेटच्या सीमेपासून सुमारे १२५ किलोमीटर अंतरावर आहे. नेपाळच्या ‘राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने’ रसुवा, नुवाकोट, धादिंग, चितवन आणि गोरखा या जिल्ह्यांतील नदीकाठच्या रहिवाशांना पुढील आदेशापर्यंत अत्यंत सतर्क राहण्याचे आणि सुरक्षेचे उपाय योजण्याचे आवाहन केले आहे.
अवश्य वाचा : नव्या चेहऱ्यांची नवी प्रेमकहाणी; ‘धप्पा’चा रोमँटिक फर्स्ट लुक पोस्टर समोर
सीमा शुल्क परिसर अन् नवा पूल वाहून गेला (Nepal Flood)
रसुवाचे सहाय्यक मुख्य जिल्हा अधिकारी ध्रुव प्रसाद अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुराच्या पाण्याची पातळी असामान्यपणे जास्त होती आणि दोन्ही वस्त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. रसुवाचे मुख्य सीमा शुल्क अधिकारी राजेंद्र ढुंगाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्टम कॉम्प्लेक्समध्ये उभी असलेली अनेक वाहने आणि सामान पाण्यात वाहून गेले आहे. तसेच नुकताच बांधण्यात आलेला एक पूलही पुराच्या तीव्र प्रवाहात वाहून गेला.
नेपाळ सैन्याने त्रिशूली नदीच्या आसपासच्या परिसरात शोध व बचाव मोहीम राबवण्यासाठी दोन हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. आपत्कालीन वैद्यकीय बचाव पथकासह सज्ज असलेले एक Mi-17 हेलिकॉप्टर त्रिशूली येथील जिल्हा रुग्णालयाकडे रवाना करण्यात आल्याचे सैन्याने स्पष्ट केले. मात्र, या भीषण पुरामुळे झालेल्या एकूण नुकसानीची पूर्ण आकडेवारी अजून समोर आलेली नसून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.



