
Nevasa lawyer murder case : अहिल्यानगर : नेवासा येथील ॲड. रियाज पठाण खून प्रकरणात (Nevasa lawyer murder case) जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी शुक्रवारी सात आरोपींना मरेपर्यंत आजीवन कारावासाची (life imprisonment) शिक्षा ठोठावली. उर्वरित पाच आरोपी पुराव्याअभावी निर्दोष मुक्त झाले. अशी माहिती विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) यांनी दिली.
नेवासा तहसील कार्यालय परिसरात हत्या
नेवासे तालुक्यातील वाळूतस्कर अण्णा लष्करे याची टोळीयुद्धातून हत्या झाली होती. त्या प्रकरणातील साक्षीपुरावे नोंदविताना १२ डिसेंबर २०१२ रोजी जिल्हा न्यायालयात साक्ष झाली तेव्हा ॲड. रियाज पठाण यांना सरकार पक्षाने कथितरित्या फितूर घोषित केले. त्यामुळे लष्करे टोळीशी संबंधित सदस्यांना राग आला होता. दरम्यान, दि. १६ सप्टेंबर २०१३ रोजी दुपारी उपनिबंधक कार्यालयाच्या आवारात ॲड. पठाण दस्त नोंदविण्यासाठी बसले असताना मोहन लष्करे, रामेश्वर गाढे, चौरंगीनाथ लष्करे यांनी ॲड. पठाण यांचे दोन्ही हात धरले आणि पवन नरुल्ला, सचिन चव्हाण, सादिक शेख हे प्रवीण खरचंद याला गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडण्यास सांगितले. प्रवीण याने तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर आरोपी पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन प्रवीण याला पिस्तुलासह ताब्यात घेतले. दरम्यान, उपचारांपूर्वीच ॲड. पठाण यांचा मृत्यू झाला होता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा खोटा प्रचार (Nevasa lawyer murder case)
‘सुनावणीदरम्यान २९ साक्षीदार तर बचाव पक्षाने ३ साक्षीदार तपासले. मुख्य आरोपी प्रवीण खरचंद याने आपण अल्पवयीन असल्याचा बनाव करीत बचावाचा प्रयत्न केला. तो खोडून काढला. तसेच, आरोपी मोहन लष्करे व सादिक शेख यांनी घटनेच्या वेळी आपण टोल नाक्यावर असल्याचा दावा करीत सीसीटीव्ही फुटेज व ३ साक्षीदार उभे केले होते. मात्र, उलट तपासणीत हा बनाव उघडकीस आला. या खटल्यात पठाण गँग आणि गाढे गैंग यांच्यातील वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा खोटा प्रचारही बचाव पक्षाने केला, जो न्यायालयात टिकू शकला नाही.’
आरोपीच्या वतीने बचावाचे तीन साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष, वैद्यकीय पुरावे आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून सात जणांना आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. परिमल फळे यांनी सहाय केले.
या खटल्यात पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. अशोक जालिंदर जगताप, सत्यवान धनराज सानकांबळे ऊर्फ लष्करे, विलास पोपट जिरे, सोपान भगवान गाढे, सुनील उर्फ सोन्या मोहन परदेशी यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.


